माऊस म्हणजे संगणकाचा हातच. संगणकाचा वापर करताना की-बोर्डसह माऊस फारच महत्त्वाचा आहे. मात्र संगणकाची देखभाल ठेवताना माऊसच्या स्वच्छतेकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. माऊसचीही देखभाल फार महत्त्वाची आहे. माऊसमध्ये दोन प्रकार आहेत. ऑप्टिकल माऊस आणि मेकॅनिकल माऊस. मात्र सध्या सर्वत्र ऑप्टिकल माऊसचाच वापर अधिक प्रमाणात केला जात असल्याने आपण या माऊसच्या स्वच्छतेकडे लक्ष देणार आहोत.

  • माऊसच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. माऊस शक्यतो माऊस पॅडवर ठेवावा. त्यामुळे टेबलावरील धूळ माऊसला लागणार नाही. माऊस पॅडही नेहमी स्वच्छ ठेवा. आठवडय़ातून एकदा तो पाण्याने धुतला तरी चालेल.
  • संगणकावर काम करताना अनेक जण खाद्यपदार्थ खाऊन काम करतात. त्यामुळे तेलकट आणि खरकटे हात माऊसला लागतात. त्यामुळे माऊस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो खात असताना संगणकाचा वापर टाळा.
  • ऑप्टिकल माऊसखाली असलेल्या लाइट सेन्सॉरची देखभाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे धुळीपासून माऊसचे संरक्षण करा. बाजारात माऊसचा कव्हर मिळतो. त्याचा वापर करा.
  • माऊस साफ करणे हे पाच मिनिटांचे काम आहे. त्यामुळे आठवडय़ातून एकदा माऊसची साफसफाई करावी.
  • माऊसची स्वच्छता करताना माऊस संगणकापासून वेगळा करा. ऑप्टिकल माऊस संगणकाला यूएसबी पोर्टने जोडलेला असतो. त्यामुळे संगणक स्विच ऑफ न करताही माऊस वेगळा करता येतो. जर माऊस वेगळय़ा कनेक्टरला जोडला असेल, तर तुम्हाला संगणक स्विच ऑफ करावा लागेल.
  • स्वच्छ कापडाचे एक टोक थोडे ओले करून त्याच्या साहाय्याने माऊस साफ करा. माऊस साफ करताना थेट पाण्याचा वापर करू नका. ओल्या कपडय़ाने माऊसवरील धूळ साफ करा.
  • माऊस साफ करताना त्याच्या एलईडी आणि लेन्सवर जास्त दाब देऊ नका.
  • कापड अधिक ओले करून माऊस साफ करू नका. लक्षात घ्या साफसफाई करताना माऊसमध्ये पाणी जाता कामा नये.
  • ओल्या कापडाने माऊस पुसून झाल्यानंतर सुक्या कापडाने पुन्हा पुसा. माऊस जराही ओलसर राहता कामा नये. पूर्णपणे सुकल्यानंतरच त्याची जोडणी संगणकाला करा.