सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे अनेक महिला गोरी, नितळ त्वचा मिळविण्यासाठी बऱ्याच वेळा सौंदर्य प्रसाधने किंवा सतत ब्युटीपार्लर, स्पा यांचा आधार घेत असतात. मात्र सतत सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यामुळे त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. सुरुवातीला सुंदर दिसणारी त्वचा कालांतराने खराब होऊ लागते. सौंदर्य प्रसाधनांमध्ये अनेक रसायने वापरली असतात. त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे ब्युटीपार्लर किंवा सौंदर्यप्रसाधने वापरण्यापेक्षा शक्यतो घरगुती पदार्थांपासून तयार केलेला फेसपॅक, लेप यांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. फेसपॅक, हेअर मास्क ज्या पद्धतीने आपण घरी तयार करु शकतो. त्याच पद्धतीने आपण बॉडीवॉशही घरी तयार करु शकतो.

अनेक जण साबणाऐवजी बॉडीवॉशचा वापर करतात. मात्र प्रत्येक वेळी बाजारातून महागडे बॉडीवॉश विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी मोजक्या सामानात आणि कमी किंमतीत आपण केमिकफ्री बॉडीवॉश तयार करु शकतो.

हर्बल बॉडी वॉश करण्याची पद्धत
साहित्य –
१. एक तृतीयांश कप कॅस्टाइल साबण
२. एक तृतीयांश कप शुद्ध मध
३. एक तृतीयांश कप अॅलोवेरा जेल किंवा कोरडफडीचा रस
४. एक तृतीयांश कप ऑलिव्ह ऑइल
५. ५० ते ६० थेंब एसेंन्शिअल ऑइल

कृती –
एका बाटलीमध्ये वरील सगळे पदार्थ एकत्र मिक्स करा. त्यानंतर त्याच्यात हळूहळू एसेंन्शिअल ऑइलचे थेंब टाकून बाटलीचं झाकण लावून बाटली दोन-तीन वेळा हलवा. त्यानंतर हे तयार लिक्विड थंडावा असलेल्या ठिकाणी ठेवा. विशेष म्हणजे हा तयार हर्बल बॉडीवॉश जवळपास १ वर्षांपर्यंत वापरता येऊ शकतो.

हर्बल बॉडीवॉशचे फायदे –

या बॉडीवॉशमध्ये ऑलिव्ह ऑइल आणि अॅलोवेरा जेलचा वापर केल्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. तसंच मधामुळे त्वचा स्क्रब केली जाते. परिणामी, त्वचेला चिकटलेले धुलिकण निघतात.