मंदीचा सामना करणाऱ्या ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी सणासुदीचा काळ बऱ्यापैकी दिलासादायक ठरला. आज(दि.७) आम्ही तुम्हाला गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 10 कार्सबाबत माहिती देणार आहोत. यामध्ये मारुती सुझुकीचा दबदबा कायम असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे टॉप 5 पैकी चार कार एकट्या मारुतीच्याच आहेत. तर, पहिल्या दहा कारचा विचार केल्यास देखील मारुतीने आपलं एकहाती वर्चस्व राखलंय. 10 पैकी तब्बल 8 कार मारुती सुझुकीच्या आहेत.

ऑक्टोबर 2019 मधील विक्रीच्या आकडेवारीनुसार, Maruti Suzuki ची लोकप्रिय सिडान कार Dzireने पुन्हा एकदा आपला ‘जलवा’ दाखवलाय. सर्वाधिक विक्री झालेल्या कारमध्ये Dzire ने अव्वल क्रमांक पटकावला आहे. गेल्या महिन्यात डिझायरच्या 19, 569 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात डिझायरच्या 17,404 युनिट्सची विक्री झाली होती. विक्रीमध्ये तुलनेने 12.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावरही मारुतीचीच Swift कार आहे. गेल्या महिन्यात एकूण 19, 401 स्विफ्ट कारची विक्री झाली. त्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकावर मारुतीची स्वस्त कार म्हणून ओळखली जाणारी Alto आहे. अल्टोच्या विक्रीमध्ये घसरण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात अल्टोच्या 22 हजार 180 युनिट्सची विक्री झाली होती. तर यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात केवळ 17,903 युनिट्सची विक्री झालीये. त्यानंतर, चौथ्या क्रमांकावर मारुतीचीच Baleno आहे. बलेनोच्या विक्रीमध्येही घट झाली आहे, पण बलेनो चौथा क्रमांक पटकावण्यात यशस्वी ठरलीये. ऑक्टोबरमध्ये बलेनोच्या एकूण 16,237 युनिट्सची विक्री झाली आहे. तर, पाचव्या क्रमांकावर Hyundaiची लोकप्रिय कार i20 आहे. ऑक्टोबरमध्ये i20 च्या 14, 683 युनिट्सची विक्री झाली. सहाव्या क्रमाकावर मारुतीची वॅगनआर ही कार आहे. तर, याच वर्षी भारतात पदार्पण करणारी दक्षिण कोरियाची ख्यातनाम कंपनी Kia Motors बाबतही चांगलंच क्रेझ असल्याचं दिसतंय. टॉप 10 कार्सच्या यादीत किया मोटर्सने सातवं स्थान मिळवलंय. ऑक्टोबरमध्ये एकूण 12,854 सेल्टॉसची विक्री झाली आहे. सेल्टॉसची क्रेझ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण, यापूर्वीच कंपनीला जवळपास 60,000 सेल्टॉसची बुकिंग मिळाली आहे. यातील 26 हजार 640 गाड्यांची लवकरच डिलिव्हरीही केली जाणार आहे. त्यानंतर आठव्या, नवव्या व दहाव्या क्रमांकावरही मारुतीचाच कब्जा असून अनुक्रमे मारुती एस-प्रेसो, ब्रिझा आणि इको या कार आहेत.