निद्रानाश ही सध्या अनेकांसाठी एक मोठी समस्या असते. या समस्येवर मात करण्यासाठी काही उपाय करणे नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेण्याचे उपाय अवलंबले जातात. मात्र योग हा झोपेच्या समस्येवरील उत्तम उपाय ठरु शकतो. श्वासोच्छवासाचे काही प्रकार व शरीराच्या काही विशिष्ट मुद्रा करून निद्रानाशाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. योगासने व प्राणायाम यांनी निद्रानाशाची कारणे टाळता येतात व निद्रानाशावर उपायही होऊ शकतो, हे शास्त्रीय संशोधनातून सिध्द झाले आहे.

रात्रीची झोप शांत व पुरेशी मिळण्यात प्राणायाम व काही योगासनांचा मोठाच उपयोग होतो. नियंत्रित स्वरुपाचा व विशिष्ट सुरातील श्वासोच्छवासाचा व्यायाम, म्हणजे प्राणायाम हा निद्रानाश, तणाव, नैराश्य, डोकेदुखी व चिंता यांवरील चांगला उपचार आहे. यात अनुलोम-विलोम, चंद्रभेदन, कपालभाती व भ्रामरी ही तंत्रे विशेषतः सर्वत्र वापरली जातात. गोदरेज इंटेरिओच्या स्लीप @ १० या उपक्रमांतर्गत याबाबतचा विशेष अभ्यास करण्यात आला आहे. श्वासोच्छवासाची एकतानता व त्यातील सातत्य यांमुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांकडून मेंदूला व शरीराला आपली गती मंद करण्यासाठी काही संदेश पाठवले जातात. ही गती मंदावल्यामुळे शरीर व मन शांत होते. त्यातूनच झोप येण्याची प्रक्रिया सुधारते.

थकावट, तणाव, नैराश्य व चिंता यांव्यतिरिक्त अस्वस्थता, छातीतील जळजळ व डोकेदुखी ही कारणेदेखील झोपेचे खोबरे करण्यास कारणीभूत असतात. शरीराच्या काही विशिष्ट मुद्रा अथवा आसने योग्य त्या पध्दतीने करण्याने विशिष्ट दुखणी दूर होतात, एवढेच नव्हे, तर संपूर्ण शरीराला आराम मिळतो. मार्जारासन, म्हणजे मांजर व उंट यांच्यासारखी मुद्रा केल्याने अन्नपचनाची क्रिया व रक्ताभिसरण सुधारते. शिशुआसन, म्हणजे लहान मुलासारखी मुद्रा केल्याने पाठीचा मणका व मज्जासंस्था यांना आराम पडून शांत झोप मिळते. अनेकदा खूप श्रम केल्याने आपण भयंकर थकलेलो असतो. थकव्याने शरीर दुखत राहते व झोप येणे अशक्य असते. अशा वेळी बध्दकोनासन, म्हणजे फुलपाखरासारखी मुद्रा केल्याने दुखरे स्नायू सैलावतात, त्यांच्या वेदना कमी होतात व झोप मिळू शकते. त्याचप्रमाणे विपरीतकरणी आसनामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढून डोकेदुखी आणि पायाचे दुखणे बरे होऊ शकते.

योगासने शिकणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे, की आसने करण्यापूर्वी व करून झाल्यानंतर शवासन, म्हणजे शवासारखी मुद्रा करणे हितावह असते. शवासनामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे जाते व शरीरालाही व्यायामाअगोदरचा व नंतरचा आराम मिळतो. तणाव, अपचन, अयोग्य रक्ताभिसरण, थकावट, डोकेदुखी, नैराश्य, चिंता व अनियमित दिनचर्या यांमुळे उद्भवणाऱ्या झोपेच्या विविध समस्यांवर व निद्रानाशावर योग हा पर्यायी उपचार आहे, हे आता जगभरात मान्य झालेले आहे. योग हा आपल्या दिनचर्येचा भाग असायलाच हवा. याचे योग्य ते शिक्षण घेणे कधीही फायदेशीर ठरते.

डॉ. प्रीती देवनानी,

स्लीप थेरपिस्ट