16 November 2019

News Flash

‘इंटरनेटच्या जास्त वापरामुळे मेंदूत बदल’

क्षमता, स्मृती आणि सामाजिक संवाद यावर परिणाम होऊ शकतो

आंतरजालाचा (इंटरनेट) जास्त प्रमाणात वापर केल्याने मेंदूमध्ये बदल होऊन लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मृती आणि सामाजिक संवाद यावर परिणाम होऊ शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबतचा अभ्यास ‘वर्ल्ड सायकॅस्ट्री’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. आंतरजालाच्या वापरामुळे जाणिवेच्या विशिष्ट क्षेत्रांत तात्पुरते आणि दीर्घकाळासाठीचे बदल होऊ शकतात. ते मेंदूमध्ये बदलाच्या स्वरूपात दिसू शकतात, असे या अभ्यासात म्हटले आहे.

आंतरजालामुळे मानवाच्या जाणिवांमध्ये कसे बदल होऊ शकतात, याबाबतचे काही प्रसिद्ध सिद्धांत या संशोधकांनी पडताळून पाहिले. त्यापुढे जाऊन अलीकडील मानसिक, मानसोपचारीय आणि चेताप्रतिमात्मक संशोधनातील निष्कर्ष या सिद्धांताला कितपत पुष्टी देतात, याचा अभ्यासही त्यांनी केला.

याविषयी ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचे जोसेफ फिर्थ यांनी सांगितले की, या संशोधनाचा प्रमुख निष्कर्ष म्हणजे आंतरजालाचा जास्त प्रमाणात वापर केल्याने खरोखरच मेंदूच्या अनेक कार्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ आंतरजालातून सातत्याने मिळणारे संदेश, सूचनांमुळे आपले लक्ष एकाच वेळी वेगवेगळ्या बाबींकडे वेधले जाते. त्यामुळे कोणत्या तरी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची आपली क्षमता कमी होऊ शकते, असे ते म्हणाले.

आंतरजालामुळे एकप्रकारे जगातील बहुतांश सर्व गोष्टींबाबतची माहिती ही आता आपल्या बोटाशी असल्यासारखी आहे. परिणामी, आपण समाजात आणि आपल्या मेंदूमध्ये जी मूल्ये, माहिती, ज्ञान संग्रहित करून ठेवतो, त्या पद्धतीमध्येच बदल घडवून आणण्याची क्षमता आंतरजाल क्रांतीमध्ये असावी, असे मत फिर्थ यांनी मांडले.

First Published on June 8, 2019 12:50 am

Web Title: internet human brain