23 November 2020

News Flash

BLOG: खिचा पापड नी पुडला… मस्जिदमधल्या खाऊगल्लीतली खासियत

हा खिचा पापड भला मोठा असतो. तांदूळ, मका आणि सोयाबीन याचे पीठ एकत्र करून केला जातो

– सुहास जोशी 

मुंबईत आलो तेव्हा आझाद मैदानजवळच्या खाऊ गल्लीबद्दल ऐकले होते, गेलो कधीच नव्हतो. पण मुंबईत येण्यापूर्वी काळबादेवी आणि प्रिन्सेस स्ट्रीट वरच्या खाऊ टपऱ्यांवर मिळणारे काही पदार्थ आवडीचे झाले होते. कुरुंदवाडला फाटकांच्या औषध दुकानात काम करायचो तेव्हा घाऊक आणि विशेष खरेदीला मुंबईत यायचो. त्यावेळी हे सर्व प्रकार सापडले. आज थोडा वेळ होता म्हणून जाताजाता मस्जिदला उतरलो. तेथे पण अशीच छोटी गल्ली आहे. अशा अनेक गल्ल्या मुंबईत अनेक ठिकाणी आहेत.

यातला खिचा पापड हा प्रकार सर्वाधिक आवडता. पोळीच्या आकाराचा हा पापड निखाऱ्यावर भाजताना सतत खेचत राहायचा, मग तो चांगला फुलतो आणि मोठ्या भाकरीच्या आकाराचा होतो. सोबत लाल-हिरवी चटणी. ह्यावर बटरचा ब्रश फिरवून चाट मसाला मारून पण मिळतो आणि खच्चून कांदा, टोमॅटो, कोबी, काकडी आणि वर शेव टाकून मसाला पापडदेखील मिळतो. (साधा 15 रुपये, बटर 20 रुपये आणि मसाला 30 रुपये).
हे असे नुसता पापड खाणे हा प्रकार तसा नवीन नव्हता. आमच्या आजोळी नान्नजला ज्वारीच्या कोंड्याचे पापड केले जायचे. ते तळून कच्च्या शेंगदाण्याबरोबर खाणे हा सुट्टीतला उद्योग. पण हा खिचा पापड भला मोठा असतो. तांदूळ, मका आणि सोयाबीन याचे पीठ एकत्र करून केला जातो. याचं नक्की मूळ माहीत नाही. कारण आज तिकडे काम करणारे सर्व उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे याचं मूळ सिंधी, गुजराती की राजस्थानी हे मला अजून माहीत नाही.

पण आज मस्जिदला मी केवळ या पापडासाठी उतरलो नव्हतो, तर तेथे पुडला नावाचा एक प्रकार मिळतो, जिलेबी आणि बडी गाठीया आणि इतर बरेच पदार्थ पण मिळतात. या गल्लीचा शोध मला अचानक लागला. जाहिरात क्षेत्रात असताना एकदा काही डायऱ्या तयार करायचा होत्या. तो व्हेंडर नेमका याच गल्लीत होता. शोधत शोधत गेलो आणि व्हेंडरच्या ऑफिसच्या खाली हे सर्व गाडे दिसले. तेव्हा मी चक्क संकष्टी वगैरे करायचो. (आता ते सर्व बंद झालं आहे) पण तेव्हा गुपचूप व्हेंडरकडे गेलो. काम आवरून खाली आलो आणि दोन मिनिटे विचार केला. उपवास वगैरे सर्व व्यर्थ आहे, मिथ्या आहे असे मनाला सांगितले आणि पुडल्याची ऑर्डर दिली.

बेसनचं पीठ डोश्याच्या तव्यावर डोश्याच्या आकारात पसरवले जाते. त्यावर बटर, थोडी मसाला पावडर टाकायची. त्यानंतर आल्याचे अगदी बारीक तुकडे (मटण खिम्याप्रमाणे) आणि वर कोथिंबीर भुरभुरायची. फार खरपूस, कडक न करता पालटून घायचे. ब्रेड स्लाइस बरोबर किंवा नुसतेच खायचे. दुसरा प्रकार म्हणजे ब्रेड पुडला. यामध्ये ब्रेडचे दोन स्लाइस पिठात बुडवून तव्यावर भाजले जातात. त्या संकष्टीला हे दोन्ही प्रकार खाल्लेच पण पापड, कॉर्नरला असलेली पापडी-जिलेबी पण हादडली. इकडची पापडी आणि बडी गाठीया प्रकार पण जरा वेगळा आहे. बडी गाठीया या एकदम कुरकुरीत न करता थोड्या मऊसर असतात. फाफडा पण असाच थोडा काही ठिकाणी मऊसर असतो. आणि खच्चून मिरी घातलेली असते.. मोठा वाडगा भरून तेथे मिरी होती.

या गल्लीच्या तोंडावर ढोकळा, खांडवी आणि अळूवडीचा मोठा ढीग लागलेला असतो. येथील अळूवाडी हे फक्त उकडलेली असते. आज भूक तशी माफक होती, त्यामुळे पुडला, बटर खिचा आणि फाफडा-बडी गाठी जिलेबी एवढेच खाल्ले. अळूवडी आणि खांडवी पार्सल घेतली, मिटिंगमध्ये खाण्यासाठी…

मस्जिद स्टेशनवर दादर एन्डला असलेल्या जिन्याने वर यायचे. रस्त्यावर डावीकडे वळून 5-7 मिनिटे चालले की उजवीकडे सत्कार हॉटेल लागेल त्याच्या समोर दर्यास्थान स्ट्रीट असा बोर्ड आहे, तीच गल्ली. या भागात आलात तर नक्की ट्राय करा एखादा पदार्थ!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 5:56 pm

Web Title: khicha papad pudala gathia fafada masjid khau galli
Next Stories
1 BLOG: भारतीय क्रिकेटला वेग देणाऱ्या टी-२० विश्वचषक विजयाची ११ वर्षे आणि धोनी
2 BLOG: सब मोह.. माया.. और ममता..
3 Blog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो !
Just Now!
X