मानवी विष्ठेतील सूक्ष्मजीवांचे विश्लेषण करून त्या व्यक्तीला यकृताचा सूत्रण रोग (लिव्हर सिऱ्होसिस) झाला आहे किंवा नाही, याचे जलद आणि सहजपणे निदान करण्यास मदत होऊ शकते, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. शास्त्रज्ञांच्या या पथकाचे नेतृत्व एका भारतीय वंशाच्या संशोधकाने केले आहे.

यकृताचा सूत्रण रोग हा त्याचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव होण्याच्या आधी लक्षात येणे कठीण असते. त्यामुळे त्याला रोखणे हेसुद्धा दुरापास्त होऊन जाते, असे ‘नेचर कम्युनिकेशन’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

मद्यपानाचे व्यसन नसलेल्या लोकांमध्येही बिगरमद्यपी मेदीय यकृत रोग (नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज-सिरोसिस) होतात. ते होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना ओळखता यावे, यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन दिएगो विद्यापीठातील संशोधकांनी अशा अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या विष्ठेतील विशिष्ट प्रकारचे जीवाणू शोधून काढले आहेत.

याबाबत युसी सॅन दिएगो स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक रोहित लुंबा यांनी सांगितले की, ‘बिगरमद्यपी मेदीय यकृत रोगासारख्या सूत्रण रोगांचे आपल्याला चांगल्या प्रकारे निदान करता आले, तर योग्य त्या व्यक्तींवरच आपण त्यासंबंधीच्या वैद्यकीय चाचण्या करू शकू. त्यातून या प्रकारचे रोग रोखण्याबरोबरच त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचारही करता येतील.’ यकृताच्या या प्रकारच्या रोगांचे निदान करण्यासाठी आता शोध लावलेल्या पद्धतीमुळे जीवाणू विश्लेषणावर आधारित इतर रोगांच्या चाचण्या आणि उपचारांचा मार्गही प्रशस्त होणार आहे. त्याशिवाय रुग्णनिहाय अचूक औषधोपचार करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.