क्षयरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालणारा कायदा राज्य सरकार करणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि तंबाखू चघळणे याविरोधात कायदा करणार असल्याचे जाहीर केले होते. सावंत यांनी नुकतेच ट्विटरवर ट्वीट करून हा कायदा लवरकच येईल, असे सांगितले होते.
या कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी जर एखादा व्यक्ती थुंकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याला परिसर स्वच्छ करण्याची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात आहे. राज्यभरात संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कायदे व न्याय विभागाशी यासंबधी चर्चा करून थुंकण्याविरोधात कायदा करण्याचा निर्णय घेतल्याचे सावंत यांनी सांगितले.
या कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकून कायद्याचे उल्लंघन केल्यास व्यक्तीला १००० रुपये दंड आणि सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी कार्यालयात स्वच्छता करावी लागेल. दुसऱ्यांदा कायद्याचे उल्लंघन केल्यास ३००० रुपये दंड आणि तीन दिवस स्वच्छतेचे काम करावे लागेल. एखाद्या व्यक्तीकडून गुन्ह्य़ाची पुनरावृत्ती होत असल्यास त्याला ५००० रुपये दंड आणि पाच दिवस स्वच्छतेचे काम करावे लागणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.
या कायद्यामध्ये प्रत्येकवेळी दंड आकारणे पुरसे नसल्याने सरकारने यासंबंधी स्वच्छतेचे काम अनिवार्य केले आहे. गुन्हेगाराच्या हातात झाडू देऊन त्याला संपर्ण परिसर आणि सरकारी कार्यालये स्वच्छ करावी लागणार आहे. यामुळे गुन्ह्य़ाच्या पुनरावृत्तीला आळा बसू शकेल, असे सावंत म्हणाले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)