करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बीएसएनएल, एमटीएनएल आणि एअरटेल या कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्यांनी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची वैधता २० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. तर एअरटेलनं १७ तारखेपर्यंत वैधता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त तिन्ही कंपन्यांनी ग्राहकांना १० रूपयांचा टॉकटाईम देण्याचाही निर्णय घेतला आहे.

यापूर्वी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर प्रीपेड ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची वैधता वाढवण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, दूरसंचार सेवांना महत्त्वाच्या सेवांमध्ये स्थान देण्यात आल्यानं लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रायनं कंपन्यांना व्हॅलिडिटी वाढवण्यास सांगितलं होतं.

ज्या प्रीपेड ग्राहकांची वैधता २२ मार्ट २०२० रोजी संपली आहे त्या ग्राहकांना २० एप्रिल २०२० पर्यंत मोफत सेवा देण्यात येणार आहे. तसंच ज्या ग्राहकांचा बॅलन्स शून्य रूपये झाला आहे, त्यांना कंपनीकडून १० रूपयांचा टॉकटाईम देण्यात येणार असल्याचं एमटीएनएल आणि बीएसएनएलकडून सांगण्यात आलं.

लॉकडाउनच्या कालावधीत मोबाईलचं रिचार्ज संपलं तर लोकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना आपल्या प्रीप्रेड ग्राहकांच्या क्रमांकांची वैधता वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. २१ दिवसांच्या लॉकडाउन दरम्यान ग्राहकांना अखंड सेवा मिळावी, असं ट्रायनं म्हटलं होतं.