नाभीपिडासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. या आसनात प्रथम बैठक स्थिती घ्यावी. मग दोन्ही पाय लांब करावेत म्हणजेच दोन्ही पायात अंतर घ्यावे.मग दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून बसल्याजागी दोन्ही पावले एकमेकांना जोडून पावलांची नमस्कार स्थिती घ्यावी. मग ही दोन्ही पावले हवेत उचलावीत आणि नाभीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी पावले एकमेकांवर ठेवलेली असावीत. पावले नाभीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. हे एक तोलात्मक आसन आहे. सुरुवातीला अवघड वाटू शकते, मात्र सरावाने जमते. आपल्या डोळ्याने समोरच्या एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित केल्यास आसन टिकवण्यास मदत होते. या आसनामुळे हातपाय मजबूत होतात.

या आसनाचा मुख्य फायदा म्हणजे पोटातील वायू सरकायला मदत होते. त्यामुळे गॅसेस तसेच गुद्दद्वाराचे रोग बरे होतात. पुरूषांना वीर्यशक्ती प्राप्त होते. नाभीजवळील गंथींचे कार्य सुधारायला मदत होते. त्यामुळे पाचकरस चांगल्याप्रकारे स्रवू लागतात, पचनशक्ती सुधारते. फक्त या आसनात तोल जाण्याचा संभव असल्याने हे आसन करताना काळजी घ्यावी. योग्य योगशिक्षक, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन नियमित करावे. त्याचा फायदा नक्कीच होतो. सुरूवातीला आसन टिकवण्याचा कालावधी १५ सेकंद ठेवावा मग हळूहळू वाढवता येतो.

 

सुजाता गानू-टिकेकर,

योगतज्ज्ञ