व्हॉटसअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. या अॅपमुळे एकमेकांशी जोडलेले राहणे सहज शक्य झाले असे म्हणत असलो तरीही त्याच्या सततच्या वापरामुळे काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वांनाच या अॅपने वेड लावले आहे. अॅप्लिकेशनचा वापर सोपा व्हावा यासाठी कंपनीकडून नवनवीन फिचर्स आणली जात असताना दुसरीकडे मात्र युजर्सना बगरचाही सामना करावा लागत आहे. या व्हॉटसअॅप बगरमुळे एखाद्याने ग्रुपवर केलेले मेसेज जसेच्या तसे न जाता वेगळेच मेसेज जात असल्याचे लक्षात आले आहे.

अचानकपणे अशाप्रकारे धुमाकूळ घालणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे युजर्स हैराण झाल्याचे WABetaInfo या वेबसाईटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्रॉइड व्हर्जन २.१९.२७ मध्ये हा बग आढळून आला आहे. ग्रुप चॅटमध्ये रिप्लाय करत असताना हा बग युजर्सच्या लक्षात आला. व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये एखाद्या मेसेजवर रिप्लाय दिल्यानंतर आपण अॅप्लिकेशन बंद करतो आणि पुन्हा तो ग्रुप उघडून पाहिल्यावर आपण केलेल्या मेसेजच्या जागी वेगळाच मेसेज असल्याचे य़ुजरच्या लक्षात आले. ही समस्या सध्या फक्त व्हॉट्सअॅपच्या फिचर्स टेस्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या बीटा व्हर्जनमध्येच असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र अशाप्रकारे वेगळाच मेसेज जात असेल तर ते युजर्ससाठी निश्चितच चिंताजनक आहे.