News Flash

मोबाइल टॉवरमधील किरणोत्साराचा आरोग्यावर परिणाम नाही

मोबाइलच्या किरणोत्साराचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचे जगभरात कोणत्याही देशात दिसून आले नाही.

| May 11, 2016 02:06 am

केंद्रीय दूरसंपर्क मंत्र्यांचा दावा

मोबाइल टॉवर आणि मोबाइल यांमधून निघणाऱ्या किरणोत्साराचा मानवी जीवनावर आणि आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. या किरणोत्साराचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे केंद्रीय दूरसंपर्क मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

मोबाइल किंवा मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सारामुळे आरोग्य बिघडू शकते, त्याचे घातक परिणाम होतात, या केवळ अफवा आहेत. या किरणोत्सारामुळे कर्करोग आणि अन्य गंभीर आजारदेखील होत असल्याची माहिती तथ्यहीन आणि निराधार आहे. याबाबतचा कोणताही प्रायोगिक पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असे रविशंकर म्हणाले.

गेल्या ३० वर्षांपासून याविषयीचे संशोधन करणाऱ्या जागतिक आरोग्य संस्थेनेदेखील कोणतीही धोक्याची सूचना अद्याप तरी दिलेली नाही. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सहा उच्च न्यायालयांनीदेखील मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या किरोणात्सरांचा मानवी जीवनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

मोबाइलच्या किरणोत्साराचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचे जगभरात कोणत्याही देशात दिसून आले नाही. मग भारतातच याबाबत आक्षेप का घेतला जात आहे? अमेरिका, ब्रिटन, चीन आणि कोरिया या देशांमध्ये मोबाइल टॉवरची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. मात्र मोबाइल टॉवरमधील किरणोत्साराचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे एकही प्रकरण समोर आले नाही. त्यामुळे भारतात नेहमी याबाबत पसरणारी माहिती केवळ अफवा आहे, असे रविशंकर यांनी सांगितले.

सध्याच्या जगात आपण मोबाइलशिवाय राहू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. मग मोबाइल टॉवरला विरोध का होत आहे? जर तुमच्या भागात मोबाइल टॉवर नसतील तर तुमचे बरेचसे कॉल वाया जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 2:06 am

Web Title: no radiation effects of mobile tower on health
Next Stories
1 हवामान बदलामुळे किडनी विकारांत वाढ
2 प्रक्रिया केलेले लाल मांस सेवन केल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ
3 ‘मेट्रोनॉमिक्स’ : कर्करोग उपचारांवरील नवी आशा
Just Now!
X