लठ्ठपणावर अनेक जण बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया करतात पण नव्या संशोधनानुसार जर नाकात ऑक्सिटोसिनचा विशिष्ट प्रमाणात फवारा मारला तर लठ्ठ लोकांचे अन्न खाण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे वजन वाढत नाही. लठ्ठपणावर हा उपाय गांभीर्याने चर्चिला जात आहे. ऑक्सिटोसिनचा कृत्रिम मात्रेतील फवारा यात उपयोगी ठरतो. ऑक्सिटोसिनमुळे अन्न खाण्याचे प्रमाण कमी होते व वजनही नियंत्रणात राहते.
मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या संशोधकांनी सांगितले की, गेल्या वर्षी ऑक्सिटोसिन नाकात फवारण्याचे प्रयोग केले असता त्यात उष्मांक प्रमाण कमी झाले व त्याचा आतडय़ांवर दुष्परिणाम झाला नाही पण हे नेमके कसे घडले याचे विश्लेषण करता आलेले नाही. यात १० वजनदार पुरुषांमध्ये ऑक्सिटोसिनचा फवारा देण्यात आला असता त्यांचे अन्न सेवनाचे वाढलेले प्रमाण कमी झाले असे फ्रान्झिस्का प्लेसॉ यांनी सांगितले.
ऑक्सिटोसिनचे हे उपचार प्रत्यक्ष वापरात आणण्यापूर्वी ते क से काम करते हे बघावे लागेल. आता याच्या जास्त मोठय़ा प्रमाणावर वैद्यकीय चाचण्या घेतल्या जाणार आहेत. स्टॉप सिग्नल टास्क तंत्र यात वापरले जात असल्याचे मानसशास्त्रीय संशोधनात दिसून आले आहे. संगणकासमोर बसून या लोकांची एक वर्तनात्मक चाचणी ऑक्सिटोसिन दिल्यानंतर करण्यात आली.
पंधरा मिनिटांच्या अंतराने दोन चाचण्या घेण्यात आल्या. २३ ते ४३ वयाच्या व २७.७ ते ३३.९ बीएमआय प्रतिमीटर असलेल्या या व्यक्तींना ऑक्सिटोसिन दिले असता ते या चाचणीत दिलेले बटन दाबत नसल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांच्या वर्तनात जास्त नियंत्रण दिसले त्यामुळे स्वनियंत्रणाचा मार्ग अनावश्यक अन्न खाण्यातही वापरला जातो व त्यात यशही आले आहे पण अजून चाचण्या कराव्या लागणार आहेत असे श्रीमती प्लेसॉ यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)