ऑनलाइन कॅब बूकिंग सेवा पुरवणाऱ्या ओलाने (Ola) सोमवारी जगातील सर्वात मोठ्या ईलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कारखान्याची घोषणा केली. 'ओला फ्यूचरफॅक्टरी' असं नाव याला देण्यात आलं आहे. यामध्ये वर्षाला एक कोटी ईलेक्ट्रिक स्कूटर तयार होतील. तमिलनाडुच्या कृष्णागिरी जिल्ह्यात ५०० एकर जागेत हा कारखाना उभा राहणार असून यात दर दोन सेकंदाला एक स्कूटर तयार होईल. कंपनीचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. या कारखान्याद्वारे १० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल, असंही अग्रवाल म्हणाले. कारखान्याचा पहिला टप्पा १ जून २०२१ मध्येच सुरू होईल, पहिल्या टप्प्यात वर्षाला २० लाख प्रोडक्शनची क्षमता असेल असं अग्रवाल यांनी सांगितलं. या कारखान्यात १० प्रोडक्शन लाइन असतील, आणि सर्व लाइनवर पूर्ण क्षमतेने काम होईल. ३००० रोबोटसह हा सर्वात आधुनिक टू-व्हीलर कारखाना असेल, बॅटरीपासून इतर सर्व उपकरणं एकाच ठिकाणी भेटतील असं अग्रवाल यांनी नमूद केलं. Visuals of the Ola Futurefactory pic.twitter.com/ZzMVOujxsE — Bhavish Aggarwal (@bhash) March 8, 2021 भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन कारखान्याचे काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच ओलाने भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. ईलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलाने नेदरलँड्सची कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करणार आहे. कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे. त्यात Etergo BV ने एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमीटरपर्यंतचं अतंर कापू शकणारी स्कूटर बनवली आहे. त्यामुळे भारतातही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारी स्कूटर लाँच करण्याचा ओलाचा प्रयत्न असणार आहे.