तुम्ही रात्री झोपताना बेडरुमच्या दरवाजे आणि खिडक्या बंद करुन झोपता का? तुमचे उत्तर हो असल्यास तुम्ही मोठी चूक करत असल्याचे नेदरलँडमध्ये नुकताच करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. बेडरुमची दारे खिडक्या उघडे ठेऊन झोपल्याने चांगली झोप लागते आणि ती आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचा निष्कर्ष या अभ्यासकांनी काढला आहे.

झोपताना बेडरुमची दारे खिडक्या उघड्या ठेवल्यास बेडरुममधली हवा खेळती राहण्यास मदत होते. बेडरुमध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी झाल्याने चांगली झोप लागते असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. नेदरलँडमधील आईंडहोवेन तंत्रज्ञान विद्यापीठ (Eindhoven University of Technology)मधील प्राध्यापक डॉक्टर अस्ती मिश्रा यांनी या विषयावर अभ्यास केला आहे. याबद्दल ते म्हणतात, आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश वेळ आपण बेडरुमध्ये घालवतो. मात्र याच बेडरुमधील हवेच्या दर्जाबाबत खूप कमी लोक विचार करतात.

या अभ्यासासंदर्भात १७ विद्यार्थ्यांच्या झोपण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. एका रात्री बेडरुमचे दरे खिडक्या बंद करुन तर दुसऱ्या रात्री दारे खिडक्या उघड्या ठेऊन त्यांना झोपण्यास सांगण्यात आले. दोन्ही परिस्थितींमध्ये बेडरुममधील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण, तापमान, आद्रर्ता अशा नैसर्गिक घटकांचीही नोंद अभ्यासकांनी केली. नैसर्गिक घटकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या शरिरामधील घटकांचे मोजमाप करण्यासाठी आर्मबॅण्ड्स आणि खास सेन्सर्सची मदत अभ्यासकांनी घेतली. यामुळे झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान, बेडचे तापमान, शरिरामधील मॉइश्चरच्या प्रमाणाबरोबरच झोपेत असताना विद्यार्थी कितीवेळा अस्वस्थ झाले हेही सेन्सर्सच्या मदतीने मोजण्यात आले.

निरीक्षणानंतर असे लक्षात आले की बंद बेडरुमध्ये झोपलेल्यानंतर विद्यार्थ्यांना बाहेरील आवाजांचा कमी त्रास झाला. असे असले तरी रुममधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूपच जास्त असल्याने हवा खेळती नव्हती. तर दुसरीकडे दारे खिडक्या उघड्या ठेऊन झोपलेल्यानंतर बेडरुमचे तापमान जास्त थंड होते असे ‘इंडोअर एअर’ या मासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दारे खिडक्या बंद करुन झोपलेल्या रात्री विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान आणि बेडचे तापमान हे दारे खिडक्या उघड्या ठेवून झोपलेल्या रात्रीपेक्षा अधिक होते. बेडरुमधील तापमान आणि कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी असणाऱ्या रात्री विद्यार्थ्यांना गाढ झोप लागल्याचे दिसून आल्याचे मिश्रांनी सांगितले. तसेच खिडक्या उघड्या ठेवणे काही कारणाने शक्य नसले तरी बेडरुमचा दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे शांत झोप लागते जे आरोग्यासाठी फायद्याचे असते मिश्रा यांनी सांगितले.