‘फोर्टिस हेल्थकेअर’ने देशातील सहा राज्यांमध्ये केलेल्या एका महत्वपूर्ण सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सिगरेट ओढल्याने आपण इतरांपेक्षा कूल (वेगळे) वाटतो म्हणून आपण धुम्रपान करत असल्याचे ५० टक्क्यांहून अधिक तरुणांनी ह्या सर्वेक्षणात सांगितले आहे. ‘Department of Mental Health and Behavioral Sciences’ विभागच्या अंतर्गत डॉ. समीर पारेख यांच्या टीमने हे सर्वेक्षण केले.

देशभरातील सहा राज्यांमधील महत्वाच्या शहरांमधील एक हजार ९०० विद्यार्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चंदीगड, जयपूर, कोलकात्ता, चेन्नई या शहरांमधील मुलांचा समावेश होता. या आकडेवारीच्या आधारे धुम्रपान करणाऱ्या तरुणाईबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या सर्वेक्षणात समोर आलेल्या काही ठळक बाबी खालीलप्रमाणे

> सिगारेट ओढल्याने एकाग्रता वाढते असे मत ५२ टक्के तरूणांनी नोंदवले. तसेच सिगरेट ओढल्याने आपण इतरांपेक्षा कूल वाटतो असे मतही त्यांनी व्यक्त केले.

> जर पालकांनी विरोध केला नाही तर आम्ही धुम्रपान सुरुच ठेवू असे ९० टक्के मुलांनी सांगितले

> आयुष्यात एकदा तरी धुम्रपान करायला हरकत नाही असे मत ८० टक्क्यांहून अधिक जणांनी नोंदवले

> धुम्रपानाचे तोटे आणि त्याचे परिणांबद्दल जागरुकता निर्माण केल्यास धुम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होईल असे, ६० टक्के मुलांनी सांगितले

> सिनेमामध्ये अभिनेत्यांना धुम्रपान करताना पाहिल्यास धुम्रपानाला चालना मिळते असे मत ८७ टक्के मुलांनी व्यक्त केले.

> धुम्रपानविरोधी मोहिमांमध्ये सेलिब्रिटींना सहभागी करुन घेतल्यास त्याचा फायदा होईल असे ७८ टक्के तरुणांना वाटते.

सन २०१५ मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरामध्ये १०० कोटींहून अधिक लोक तंबाखूचे सेवन करतात. भारतामध्ये १८ वर्षांवरील ३४.६ टक्के व्यक्ती धुम्रपान करतात. यामध्ये ४७.९ टक्के पुरुष तर २०.३ टक्के स्त्रियांचा समावेश आहे.