पावसाळा सुरू झाला की अनेकजण पावसाचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांची पसंती ही हिल्स स्टेशन, ट्रेकिंग, धबधबे अशा ठिकाणी जात असतात. त्यात करोनाच्या काळात अनेकजण गेली दोन वर्ष करोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून घराबाहेर पडले नाहीत. मात्र, आता प्रत्येकजण पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहे. आणि फिरायला जाताना तुम्ही जर योग्य तयारी नाही केली तर फिरायला जाण्याची सगळी मजा किरकिरी होऊन जाते. त्यामुळे तुम्ही फिरायला जात असाल, तर या खास ५ टिप्स लक्षात ठेऊन तयारी करा आणि पावसाळ्यातील फिरण्याची मजा मस्त एन्जॉय करा.

– पावसाळ्यात फिरायला जाताना योग्य ठिकाण निवडा व तेथील परिस्थितीचा आढावा घ्या. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी नदी, नाले तुडुंब भरून जातात. अशा ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते. तसेच नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून देखील जातात. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहेत, तेथील गावकर्‍यांकडून त्या ठिकाणची माहिती घ्या.

– सध्या करोनाचं संकट असल्याने बाहेर गेल्यावर कोणत्याही वस्तूला हात लावल्यास हात स्वच्छ करा आणि ओला मास्क लावणे टाळा. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

– फिरायला जाताना तेथील स्थानिक परिस्थितीची माहिती घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, पोलिस स्टेशनची माहिती घ्यावी. गरजेच्या वेळी या गोष्टी पटकन कामी येऊ शकतात.

– या दिवसात कुठेही पिकनिकला जाताना सोबत एक मेडिकल किट असणं गरजेचं आहे. कारण अशी ठिकाणं शहरांपासून व गावांपासून जरा लांबच असतात. अशावेळी काही झाल्यास वेळेवर मदत न मिळाल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे एक मेडिकल किट सोबत ठेवा.

– पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेनुसार औषधं घेऊन जावीत.