तंत्रज्ञानाची प्रगती झाली तशी आपली जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. त्याचे परिणामही आपण अनुभवत आहोत. पूर्वी अभावानेच आढळणारे मधुमेह, रक्तदाब, पीसीओडी, थायरॉईड ग्रंथींचे विकार आता अगदी आपल्या घरात आणि सहज जाता-येता दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याचे बजेट करण्यासाठी हेल्थ पॉलिसी घेण्याची आवश्यकताही भासत आहे. साधारणपणे १० वर्षांच्या टप्प्याने आपली जीवनशैली बदलत आहे. बदलणाऱ्या आर्थिक गरजा, कामाचे स्वरुप, त्यातून निर्माण होणारा बौद्धिक ताण, मानसिक अस्वस्थता, शारीरिक श्रम या सगळ्यांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.

या परिणामांना तोंड देण्याची आपली क्षमता वाढावी आणि आपल्या आरोग्याचे रक्षण व्हावे यासाठी काही ठराविक नियमांचे पालन केले तरी पुरेसे आहे. यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नियम बदलणाऱ्या ऋतूनुसार नियमांचे पालन, योग्य व्यायाम, आहारसेवनाची शास्त्रीय पद्धत, झोपेचे नियम यांचे विचारपूर्वक आचरण करणे हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे. यामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी काही सामन्य नियम आहेत ते पाळणे आवश्यक आहेत.

१. झोपेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. कमीत कमी ७ तास झोप व्हायलाच हवी. शक्यतो रात्री लवकर झोपलेले आरोग्यासाठी चांगले.

२. सध्या रात्री टीव्हीवरील मालिका, चित्रपट पाहणे, मोबाईल किंवा इंटरनेटवर चॅटींग करणे यांसारख्या गोष्टींसाठी जागरण करण्याची अनेकांना चुकीची सवय लागली आहे.

३. रात्रीच्या जागरणांमुळे शरीरातील पित्त वाढते. त्यामुळे डोकेदुखी, अजिर्ण, अपचन असे त्रास होण्याची शक्यता असते.

४. अन्नपचन न झाल्यामुळे करपट ढेकर येणे आणि गॅसेस होण्याच्या तक्रारी वाढतात.

५. पित्त आणि पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी कामाचा उत्साह राहत नाही.

६. समाधानकारक काम न झाल्याने कामाचा ताण वाढतो आणि हे चक्र सतत सुरु राहते.

७. या सगळ्याचा परिणाम म्हणून ब्लड प्रेशर वाढते. मग अस्वस्थता, चिडचिड यांचे प्रमाणही वाढते. यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पचन यंत्रणेवर परिणाम होऊन संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते.

लीना बावडेकर

आयुर्वेदतज्ज्ञ