PUBG Mobile India गेमची आतुरतेने वाट बघणाऱ्यांसाठी एक निराशाजनक वृत्त आहे. हा रॉयल बॅटल गेम डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात किंवा नववर्षाच्या सुरूवातीला लाँच होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आता आलेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत तरी हा गेम लाँच होण्याची शक्यता नाहीये.

InsideSport च्या रिपोर्टनुसार, पब्जी कॉर्पोरेशनने जवळपास एक महिन्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे बैठकीसाठी वेळ मागितला होता, पण अद्याप मंत्रायलाकडून त्यावर कोणतंही उत्तर आलेलं नाहीये. रिपोर्टमध्ये पबजी कॉर्पोरेशनमधील सुत्रांच्या आधारे, भारतातील पबजीवरील बॅन अजून काही महिने तरी हटवला जाण्याची शक्यता कमी आहे असं नमूद करण्यात आलं आहे. PUBG कडून गेमच्या पुनरागमनासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले, पण अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुढील काही महिन्यात गेमचं भारतात पुनरागमन होण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. किमान मार्च 2021 पर्यंत तरी गेमचं भारतात पुनरागमन होण्याची शक्यता नाही, असं सुत्रांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात PUBG Mobile India च्या लाँचिंगची घोषणा झाल्यापासून हा गेम बराच चर्चेत आहे. गेमबाबतचे अनेक रिपोर्ट्स सतत समोर येत आहेत.

सप्टेंबरमध्ये घातली बंदी :-
केंद्र सरकारने या वर्षी सप्टेंबरमध्ये देशात PUBG Mobile सहीत 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. चीनसोबत सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. बॅन लागल्यापासून पबजी कॉर्पोरेशन भारतात या बॅटल रॉयल गेमच्या पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहे. गेमच्या लाँचिंगबाबत समोर आलेलं नवं वृत्त गेमच्या चाहत्यांसाठी निराशाजनक असलं तरी लवकरच याबाबतची चांगली बातमी समोर येईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.