अनेक फळे  घरी आणल्यानंतर फार काळ टिकत नाहीत. ती खराब होतात पण आता वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाने तेल व पाणी यांचे मिश्रण असलेले इमल्शन वापरून फळे जास्त काळ टिकवण्याचे तंत्र विकसित केले आहे.  
फळे हंगामानंतर जेव्हा हाती येतात, तेव्हा ती खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्यांना बाजारभाव मिळणे कठीण होते. त्यामुळे फळांचे आयुष्य वाढवणारे हे तंत्रज्ञान शेतक ऱ्यांच्या फायद्याचे आहे. विशेष म्हणजे यात पर्यावरणस्नेही पदार्थ वापरले जातात.
साधारणपणे सफरचंदे किंवा पेर यासारख्या फळांना सुपर मार्केटमध्ये मेणाचे आवरण देऊन ठेवले जाते. त्यामुळे ती चकचकीत व ताजी वाटतात. तसेच यात गुजरातच्या या विद्यापीठाने फळे टिकवण्यासाठी त्यांना इमल्शनचे आवरण देण्याचे तंत्र शोधले आहे. त्यामुळे फळे ताजी राहतात. त्यात आंबा १० दिवस तर जांभळे २० दिवस ताजी राहतात. फलोत्पादनात गुजरात पहिल्या १० राज्यांमध्ये आहे व त्याची या व्यवसायातील उलाढाल ही ११,४०० कोटींची आहे. अॅसोचेमच्या पाहणीनुसार हंगामोत्तर काळात २०१४ मध्ये फळे व भाज्या सडल्याने अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले होते. आता पर्यावरणस्नेही आवरणामुळे हे नुकसान होणार नाही, फळांची पिकण्याची प्रक्रिया लांबवून त्याची पोषण मूल्येही वाढतील.
चीननंतर फळे व भाज्यांच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. २०२१ पर्यंत हे उत्पादन ३७ कोटी ७० लाख  मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे पण साठवण सुविधांअभावी मोठी आर्थिक हानी यात होऊ शकते, असे सरदार पटेल विद्यापीठाचे जैवविज्ञानाचे प्राध्यापक टी.व्ही.रामाराव यांनी सांगितले. जैव बहुलकांच्या मदतीने (बायोपॉलिमर्सच्या) फळांचे आयुष्य वाढवण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
 त्यामुळे केळी, आंबे, पपया, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, जांभळे, पेरू, सीताफळ, पेर, टोमॅटो, ढोबळी मिरची व ब्रोकोली जास्त काळ टिकवणे शक्य होत आहे. जैव बहुलकांच्या या मिश्रणात सोडियम अलगिनेट, चितोसान, स्टार्च, झँथन गम व सोया प्रोटीन, जिलेटीन यांचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे भाज्या व फळांचे आयुष्य ४० टक्के वाढवण्यात यश आले आहे, असे राव यांनी सांगितले.

फळे व भाज्या टिकविण्याचे व्यवस्थापन
* फळे व भाज्या खराब झाल्याने गतवर्षी गुजरातेत अडीच लाखांचे नुकसान
* जैविक आवरणामुळे आयुष्यकाळ चाळीस टक्क्य़ांनी वाढवण्यात यश
* फळे व भाज्यांना सोडियम अलगिनेट, चितोसान, स्टार्च, झँथन गम व सोया प्रोटीन, जिलेटीन यांचे जैविक आवरण
* केळी, आंबे, पपया, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, जांभळे, पेरू, सीताफळ, पेर, टोमॅटो, ढोबळी मिरची व ब्रोकोली जास्त काळ टिकवणे शक्य
* फळे व भाज्या उत्पादनात भारत जगात दुसरा.
* २०२१ पर्यंत हे उत्पादन ३७ कोटी ७० लाख मेट्रिक टन
साठवणाच्या सुविधांची अनुपलब्धता.