आहारात मिठाचे जास्त प्रमाण असल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन स्मृतिभ्रंशाचा धोका होऊ शकत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. अभ्यासातील निष्कर्षांमुळे मिठाचे अतिसेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणाम रोखण्यासाठी तयारी करता येणार आहे, आम्ही केलेल्या प्रयोगांमध्ये अतिमिठाचे सेवन केल्याने रक्तदाबामध्ये वाढ न होताही स्मृतिभ्रंश झाल्याचे आढळले, असे अमेरिकेतील वेईल कॉर्नेल मेडिसिनचे कॉन्स्टाइन आयडेकोला यांनी म्हटले. उंदरावर केलेल्या या प्रयोगाचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते, कारण मनुष्यांमध्ये मिठाच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. अमेरिकेत सुमारे ९० टक्के प्रौढ गरजेपेक्षा म्हणजे दिवसाला २,३०० मिलिगॅ्रमहून अधिक मिठाचे सेवन करीत असल्याचे आढळले आहे. या प्रयोगासाठी उंदरांना आहाराच्या चार किंवा आठ टक्के मीठ देण्यात आले होते. त्यांच्या आहारातील मिठाची उच्च पातळी ही मनुष्यांच्या अतिमीठ सेवनाच्या तुलनात्मक पातळीवर होती. आठ आठवडय़ानंतर त्यांच्या मेंदूतील दोन भागांमध्ये रक्तपुरवठय़ाचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. मेंदूचे हे भाग स्मरणशक्ती आणि शिकण्यासाठी कारणीभूत असतात. बाहय़पटलात २८ टक्के रक्तपुरवठा कमी झाला तर हिप्पोकॅम्पसमध्ये २५ टक्के रक्तपुरवठा कमी झाला. पेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या एंडोथियल पेशींमध्ये नायट्रिक ऑक्साइडच्या निर्मितीचे प्रमाण कमी करते. हा वायू रक्तवाहिन्यांना विश्रांती देत रक्तपुरवठय़ात वाढ करण्याचे काम करतो. अतिमिठामुळे होणारे दुष्परिणाम उलट केले जाऊ शकतात का हे पाहण्यासाठी उंदरांना पुन्हा चार आठवडय़ांसाठी नेहमीचा आहार देण्यात आला. त्यांनंतर त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा पुन्हा सामान्य झाला. हा अभ्यास नेचर न्यूरोसायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.