जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही आपलं केव्हायसी अपडेट केलं नसेल तर तुमचं खातं फ्रीझ केलं जाऊ शकतं. बँकेने एक सार्वजनिक नोटीस जारी करून आपल्या ग्राहकांना केव्हायसी अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे.

केव्हायसी नसलेली खाती फ्रीझ केली जाऊ शकतात, असं देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेनं सांगितलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी केव्हासी अपडेट करण्याचं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. तसंच ज्या ग्राहकांचं केव्हायसी अपडेट करण्यात आलं नाही, अशा ग्राहकांना नोटीसदेखील पाठवण्यात आल्याचं म्हटलं आहे. याद्वारे ग्राहकांना २८ फेब्रुवारी पर्यंत केव्हायसी अपडेट करण्याची विनंती करण्यात आली आहे.

२८ फेब्रुवारीपूर्वी केव्हायसीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर अशी खाती फ्रीझ केली जातील, असं या सार्वजनिक नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. यापूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडियानंही अशाप्रकारची नोटीस जारी करून आपल्या खातेधारकांना केव्हायसी अपडेट करण्याचं आवाहन केलं होतं. ग्राहकांप्रमाणेच सर्व वाणिज्यिक बँक, सरकारी बँक, सरकारी बँक, गैर सरकारी वित्तीय कंपन्या आणि अन्य मायक्रोफायनॅन्स कर्जदात्यांनाही केव्हायसी अपडेट करणं अनिवार्य आहे.