सिगरेटचा धूर हा केवळ ती फुंकणाऱ्या व्यक्तीलाच हानिकारक असतो अशातला भाग नाही. घरात, कार्यालयात जे धूम्रपान करतात त्या वेळी दुय्यम म्हणजे प्रत्यक्ष धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींचे डीएनए नादुरुस्त होऊन कर्करोग होऊ शकतो. सिगरेटचा धूर घरातून जात नाही. तो भिंती, फर्निचरला चिकटून राहतो. लहान मुलांच्या खेळण्यांवरही धूर राहतो, तीच खेळणी मुले तोंडात घालतात. लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी या अमेरिकी संस्थेतील वैज्ञानिक बो हँग यांनी सांगितले की, हा दुय्यम व तिय्यम प्रकारचा धूर घातक ठरतो. त्यामुळे घरात व कार्यालयात कधीही धूम्रपान करू नये. दुय्यम प्रकारच्या धुरात ४ हजार संयुगे अशी असतात जी घरात बराच काळ टिकून राहतात. घरामधील ओझोन व नायट्रस अ‍ॅसिड यासारखे घटक कर्करोगकारक संयुगात रुपांतरित होतात. त्यात ‘एनएनए’ हे एक संयुग आहे. हँग यांच्या संशोधनानुसार तंबाखूशी निगडित नायट्रोसमाइन डीएनएमध्ये अडकते, त्यामुळे कर्करोग होतो. इतरही काही संयुगे डीएनएमध्ये कर्करोगकारक उत्त्परिवर्तने घडवून आणतात. सिगरेटमधील निकोटिनशी संबंधित एनएनके हा घटकही कर्करोगकारक आहे.डीएनएला हानी पोहोचल्याने पेशींची अर्निबध वाढ होऊन कर्करोग होतो. लहान मुलांवर सिगरेटच्या धुराचा खूप वाईट परिणाम होत असतो, कारण एकतर ते दुय्यम व तिय्यम स्वरुपाच्या धुरातील घटक खेळणी तोंडात घातल्याने शरीरात घेत असतात. सोफा, कार्पेटवरही सिगरेटचा धूर अडकलेला असतो. त्यामुळे मुलांना धोका निर्माण होतो. कपाटावरही हा धूर किंवा त्यातील घटक अडकलेले असतात. धूर अडकलेले सोफा, कपाटे, कार्पेट बदलणे त्यासाठी आवश्यक ठरते. घराला परत रंग देणे हाही एक उपाय त्यात सांगितला जातो. अमेरिकन केमिकल सोसायटी, डल्लास या संस्थेच्या बैठकीत संशोधन जाहीर करण्यात आले आहे.