News Flash

स्मार्ट वाहतूक..

केंद्रीय परिवहन विभागाने ‘स्मार्ट वाहतूक प्रणाली’च्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच एक अधिसूचना काढली आहे.

अनिल पंतोजी

दुबईत उतरल्यानंतर आपण प्रथम प्रेमात पडतो ते तेथील वाहतूक व्यवस्थेच्या. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने तेथील वाहतूक सुरू असते. ना रस्त्यावर कधी अपघात घडत ना वाहतूककोंडी. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस नावाची मानवी यंत्रणा दुबईत आहे का, असा प्रश्न आपल्याला पडतो, कारण रस्त्यावर कधी वाहतूक पोलिसाचे दर्शनच होत नाही.. हे सर्व सुरू आहे ते तेथील ‘स्मार्ट वाहतूक प्रणाली’चा (जीपीओ) काटेकोरपणे वापर होत असल्यामुळे. हे सर्व आपल्याकडे का नाही, असा प्रश्न दुबईत गेलेल्या प्रत्येक भारतीयाला पडत असतो. पण आता हे भारतातही शक्य होणार आहे.

रस्ते अपघात ही आपल्याकडील गंभीर समस्या आहे. वाहन दुर्घटनांना वाहनचालक, वाहन, रस्ता, इतर घटक (उदा. प्रतिकूल हवामान, रस्त्यावरील चुकीच्या जाहिराती, वाहतुकीची चिन्हे आय.आर.सी. कोडप्रमाणे नसणे इ.) हे घटक अपघाताला कारणीभूत ठरत असतात. रस्ता सुरक्षा अभियानात आपल्याकडे वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येते. तसेच सध्या वाहनांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींचा वापर करण्यात येतो. मात्र रस्त्यावरील सुरक्षा व व्यवस्थापनही स्मार्ट होणे अपेक्षित आहे.

वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येबरोबरच त्यांना आवश्यक असे नवीन रस्ते निर्माण करणे खर्चीक, प्रदीर्घ कालावधी व जमिनींची कमतरता यामुळे हे परवडण्याजोगे नाही. उपलब्ध माहितीनुसार वाहतुकीच्या कोंडीमुळे १.५ लाख कोटी रुपये इंधनाचे नुकसान होते. या खर्चात देशाची शिक्षण व आरोग्य विभागाची वार्षिक योजना पूर्ण करता येऊ शकते. यामुळे ‘स्मार्ट वाहतूक प्रणाली’ची देशाला गरज आहे.

केंद्रीय परिवहन विभागाने ‘स्मार्ट वाहतूक प्रणाली’च्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार देशातील प्रमुख महामार्ग, धोकादायक काटरस्ते, अपघात प्रवणस्थळे व १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे या ठिकाणी असलेल्या वाहतुकीवर रस्ता सुरक्षेची उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉनिक निरीक्षण व अंमलबजावणी केली जाणार आहे. याकामी  ब्लूटूथ, वायफाय, व्हिडीओ इमेजिंग, ऑटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्नीशन सिस्टीम, जीपीएस, जीओ फेसिंग, रडार या तंत्रांचा वापर करता येऊ शकेल व यामुळे आपली वाहतूककोंडी दूर करण्याचे उद्दिष्ट प्राप्त करता येईल. यासाठी संगणक, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स इ. तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवासाचा वेळ, त्या दरम्यानचे थांबे व प्रवासातील दिरंगाई कमी होईल.

पायाभूत सुविधा

स्मार्ट वाहतूक प्रणालीचा (आयटीएमएस) उपयोग रस्ते व्यवस्थापनात केल्यास वाहतूक सुरक्षित, किफायतशीर व पर्यावरणपूरक करता येईल. खालील व्यवस्थापनांमध्ये स्मार्ट परिवहन प्रणालीचा वापर केला जात आहे.

’ प्रमुख रस्ते व्यवस्थापन

’ मुक्त रस्ता व्यवस्थापन

’ प्रवास व माहिती व्यवस्थापन

’ घटना व्यवस्थापन

’ वाहन जकात व्यवस्थापन

’ आपदा व्यवस्थापन

’ व्यावसायिक वाहन व्यवस्थापन

’ रस्ते दुरुस्ती व देखभाल व्यवस्थापन

’ माहिती व्यवस्थापन

दूरचित्रवाणी तंत्रज्ञान : वाहतूक कोंडीवर मात

वाहतूककोंडी रोजची समस्या आहे. त्यावर उत्तम उपाय म्हणजे वाहतुकीवर दूरचित्रवाणी तंत्रज्ञानाचा वापर. वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण केंद्राच्या साहाय्याने वाहतुकीस मार्गदर्शन, वाहतूक दिव्यांवर नियंत्रण व नियमांची अंमलबजावणी व इतर समस्यांचे निराकारण करता येऊ शकेल.

वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण केंद्र

’ सीसीटीव्ही, एटीसी/ सिग्नल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक फोन आणि ईमेल

’ ‘एफएम’वर वाहतुकीसंबंधी सद्य:स्थितीची माहिती

’ वेबसिग्नलवर विविध रंगसंगती रस्ता नकाशा

’ वाहतुकीचे नियम भंग केल्यास ई-चलान

’ सर्व सिग्नल्स्वर सूचना

’ शहरातील सूचना फलकावर माहिती

’ प्रदूषण नियंत्रण पातळी

’ हवामानाचा अंदाज

वाहतुकीचे मार्गदर्शन

शहरातील मुख्य रस्त्यांवर, प्रसिद्ध स्थळी, अपघातप्रवण स्थळ व चौकांमध्ये स्मार्ट कॅमेरे बसविले जातात. रस्त्यावरील वाहतुकीचे निरीक्षण, लेनची शिस्त, रस्त्यांची परिसीमा, वाहतुकीची प्रत्यक्ष वेळेची स्थिती व वाहनसंख्या याबाबत सर्व माहिती विविध प्रकारच्या कॅमेऱ्याद्वारे वाहतूक व्यवस्था नियंत्रण केंद्रास याद्वारे पाठविली जाते. पोलीस अधिकारी व इतर कर्मचारी नियंत्रण केंद्रातील डिजिटल स्क्रीनवर (पडद्यावर) रस्त्याचे निरीक्षण करतात व वाहतुकीची कोंडी झालेल्या रस्त्यावर स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून ती दूर केली जाते. वाहतुकीची कोंडी जास्त वेळ राहणारी असल्यास त्याबाबतची माहिती चौका-चौकातील डिजिटल स्क्रीनवर दिली जाते व पुढील प्रवासाचा अपेक्षित वेळ दर्शविला जातो.

दिव्यांचे (सिग्नल) नियंत्रण

सिग्नल व त्यामधील दिवे आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हुशार (स्मार्ट) झाले आहेत. त्यामुळे ते संवेदनशील, वाहन गणनक्षमता व इतर सिग्नलांशी सुसंवाद साधू शकतात.  स्मार्ट सिग्नलिंगद्वारे चौक पार करण्याचा कालावधी वाहनांच्या संख्येनुसार कमी-जास्त होतो. स्मार्ट सिग्नलचा फायदा म्हणजे चौकातील गर्दी नियंत्रित करता येते. तसेच आपदा व्यवस्थेतील वाहनांना मानवी हस्तक्षेपाशिवाय चौक पार करता येतो.

नियमांची अंमलबजावणी

वाहनचालकांकडून अवैध पार्किंग, चुकीचा यू टर्न,  झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहन थांबवणे, हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल तोडणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे असे गुन्हे घडत असतात. जर रस्ता कायदेशीर व जबाबदारीने वापरला तर वाहतुकीची कोंडी किंवा दुर्घटना टाळता येईल. याकरिता वाहतूक नियमांची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे. वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण केंद्राकडे प्रत्यक्षवेळी उपलब्ध चित्रफितीचा आधार घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना ई-चलानद्वारे कारवाई करता येऊ शकते.

यासाठी  व्हिडीओ व्हेईकल डिटेक्शन, इमेज प्रोसेसिंग, लिडार, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्नीशन, इन्फ्रा रेड कॅमेरा तसेच सीसीटीव्ही इत्यादींचा वापर करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 9:53 am

Web Title: smart traffic system smart traffic monitoring and management system zws 70
Next Stories
1 ‘रेमडेसिविर’चा योग्य वापर
2 सौंदर्यभान : मलाझ्मा
3 Video : मासिक पाळीदरम्यान लस घ्यावी की नाही?, डॉक्टर म्हणतात…
Just Now!
X