पिता धूम्रपान करीत असेल, तर ते आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी धोकादायक ठरू शकते. पित्याच्या धूम्रपानामुळे आईचा धुराशी संपर्क येतो. त्यामुळे गर्भावस्थेतील बाळामध्ये जन्मजात हृदयदोष तयार होऊ शकतो. बाळाचा गर्भावस्थेतच मृत्यू होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

जगभरातील आकडेवारी लक्षात घेतली असता, बाळात जन्मजात हृदयदोष निर्माण होण्याचे प्रमाण एक हजारात आठ असे आहे. शल्यचिकित्सेतील आधुनिक शोधांमुळे उपचार आणि जीवनमान सुधारत असले तरी जन्मजात हृदयदोषाचे दुष्परिणाम जीवनभर सहन करावे लागतात.

हे दुष्परिणाम लक्षात घेता, घरात पाळणा हलणार असेल, तर पित्याने आपली धूम्रपानाची सवय सोडून दिली पाहिजे, असे ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेन्टिव्ह कार्डिओलॉजी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात.

याबाबत, चीनमधील सेंट्रल-साऊथ विद्यापीठाचे जियाबी क्विन म्हणाले की, ‘‘गर्भवती महिलांचा पती जर धूम्रपान करीत असेल, तर त्याच्या या सवयीमुळे ही महिला मोठय़ा प्रमाणावर धुराच्या संपर्कात येते. त्यातही ही महिलासुद्धा धूम्रपान करीत असेल, तर गर्भावस्थेतली बाळासाठी हे अधिकच धोकादायक असते.’’

‘‘धूम्रपान हे व्यंगजनक असते. याचाच अर्थ ते गर्भाच्या विकासाच्या प्रक्रियेत दोष निर्माण करू शकते. प्रजननाच्या वयातील महिला-पुरुषांमधील धूम्रपानाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, बाळाला गर्भावस्थेत जन्मजात हृदयदोष जडण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,’’ असे क्विन यांनी स्पष्ट केले. याबाबत झालेल्या विविध १२५ अभ्यासांचे विश्लेषण करून संशोधकांनी हे निष्कर्ष काढले आहेत. यात जन्मजात हृदयदोष असलेल्या एक लाख ३७ हजार ५७४ बाळांची आणि ८० लाख पालकांची माहिती तपासण्यात आली.