मेलबर्न : मधुमेहावरील उपचारात नवीन प्रकारचे इन्शुलिन उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. या इन्शुलिनची मात्रा देण्याची पद्धतही वेगळी असून त्यामुळे मधुमेही रुग्णांना जास्त फायदा अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियातील दी फ्लोरे इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूरोसायन्स या संस्थेतील संशोधकांनी म्हटले आहे,की ग्लायको इन्शुलिनचे यात विश्लेषण करण्यात आले असून त्या माध्यमातून रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करता येते. वैज्ञानिकांच्या मते सध्या अनेक इन्शुलिनचे पंप वापरतात. त्यात काहीवेळा औषध शरीरात पोहोचण्यात अडथळे येतात, परिणामी रुग्ण धोक्यात येतो. त्यामुळे आमचे संशोधन हे वेगळे असून त्यात फिब्रिल्स तयार होत नसल्याने ग्लायको इन्शुलिन उष्ण तापमानाला पोहोचते व योग्य प्रमाणात ते शरीरात जाते. शिवाय मूळ इन्शुलिनपेक्षा ते अधिक स्थिर असते. याचा अर्थ ग्लायकोइन्शुलिन हा इन्शुलिन पंपांना योग्य पर्याय आहे, असे या संस्थेचे प्राध्यापक अख्तर हुसेन यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ग्लायकोइन्शुलिनचे उत्पादन करणे शक्य आहे पण त्यासाठी आणखी वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील. इन्शुलिन पंप संच हे दर २४ ते ७२ तासांनी बदलावे लागतात, कारण त्यात फिब्रिल्सचा धोका असतो. अंडय़ाच्या बलकापासून इन्शुलिन -साखर यांचे एक वेगळे संयुग तयार करण्यात आले. ते इन्शुलिनचे सुधारित रूप असून ग्लायकोइन्शुलिन हे स्थिर राहते. त्याची रचना ही चक्राकार असते. प्रयोगशाळेत प्राण्यांवर त्याचे प्रयोग यशस्वी झाले असून ‘अमेरिकन जर्नल ऑफ केमिकल सोसायटी’ या नियतकालिकात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.