टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित हॅरियर ही एसयुव्ही श्रेणीतील गाडी अखेर बाजारात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. टाटा मोटर्सनं प्रसारीत केलेल्या व्हिडीयोमध्ये या गाडीची वैशिष्ट्ये दिसतात. टाटाच्या पुण्यामधल्या कारखान्यात या गाडीचे उत्पादन करण्यात येत आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी या गाडीसाठी असेंब्ली लाइन बसवण्यात आली आणि वेगाने काम पूर्ण करण्यात आले. कंपनीनं 30 हजार रुपयांमध्ये गाडीचं बुकिंग सुरू केलं असून हुंदाईच्या क्रेटा व महिंद्राच्या एक्सयुव्ही 500 ला गाडी टक्कर देईल असा अंदाज आहे.

या कारचे लुक्स काहिसे आक्रमक ठेवण्यात आले असून ऑटो एक्स्पो 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या एच5एक्स या कन्सेप्टशी मिळती जुळती ही गाडी आहे. टाटाच्या इम्पॅक्ट 2 डिझाईनचा या मॉडेलवर प्रभाव आहे. नवीन ओमेगा प्रकारचं या गाडीत आर्किटेक्चर असून प्रथमच लँडरोव्हरचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात ही गाडी रस्त्यावर धावताना दिसेल अशी अपेक्षा आहे. ज्या प्रकारे टाटा ही गाडी सादर करतंय ते बघता कंपनीला चांगल्या प्रतिसादाची व मोठ्या प्रमाणावर बुकिंगची अपेक्षा असल्याचे जाणवत आहे. हवं त्या वेगाने उत्पादन घेण्यासाठी पुण्याच्या कारखान्यातली असेंब्ली लाईन सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.

2019च्या सुरुवातीला टाटा हॅरियरच्या वितरणाला सुरूवात होईल असे टाटा मोटर्सच्या पॅसेंजर्स वेहिकल बिझिनेस युनिटचे अध्यक्ष मयंक परीक यांनी सांगितले. पुडील वर्षी एसयुव्ही सेगमेंटमध्ये ही गाडी नवे बेंचमार्क निश्चित करेल असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.