इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ला जबरदस्त झटका बसलाय. नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर अनेक युजर्सनी WhatsApp आपल्या फोनमधून हटवण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर आता टेलिग्राम (Telegram) हे अ‍ॅप जानेवारी महिन्यात जगातील सर्वाधिक डाउनलोड होणारं नॉन गेमिंग अ‍ॅप बनलंय.

जानेवारी महिन्यात Telegram अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांमध्ये भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक 24 टक्के होतं. Sensor Tower च्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. सेन्सर टॉवरच्या रिपोर्टनुसार, जानेवारीमध्ये 63 मिलियन म्हणजे 6.3 कोटी लोकांनी टेलिग्राम डाउनलोड केलं, यातील 1.5 कोटी डाउनलोडिंग फक्त भारतातूनच आहे. भारतानंतर इंडोनेशियामध्ये टेलिग्राम (10 टक्के) सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलं.

सेन्सर टॉवरच्या रिपोर्टनुसार, जानेवारी 2021 मध्ये डाउनलोडिंगच्या बाबतीत Telegram पहिल्या क्रमांकावर , TikTok दुसऱ्या क्रमांकावर, Signal तिसऱ्या क्रमांकावर, Facebook चौथ्या क्रमांकावर आहे. WhatsApp ची स्थिती त्याहून खराब आहे. तिसऱ्या स्थानावरुन आता पाचव्या स्थानावर WhatsApp ची घसरण झालीये.