१. अनेकांच्या घरात जागा कमी असल्याने ते फ्रिजवर टोस्टर, ओव्हन, मिक्सर, फूडप्रोसेसर आशा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवतात. मात्र त्यामुळे फ्रिजचे कूलिंग कमी होण्याची शक्यता असते.

२. फ्रिजमध्ये जास्त वस्तू असतील तरीही त्यातील कूलिंग कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक तेव्हड्याच वस्तू फ्रिज मध्ये ठेवा.

३. फ्रिजमध्ये पदार्थ किंवा भाज्या, फळे हे ठेवताना त्या गोष्टींमध्ये पुरेशी जागा असेल असे बघा. एकदम गर्दीत वस्तू ठेवल्या की फ्रिजचे कूलिंग कमी होते. त्यामुळे मधे मोकळी जागा राहील याची काळजी घ्या.

४. फ्रिजच्या मागच्या बाजूला डबे, पदार्थ टेकून राहणार नाहीत याची काळजी घ्या. मागच्या बाजूने कूलिंगची हवा येते. पण तुम्ही जर वस्तू मागे चिकटून ठेवल्यात तर ही कूलिंगची हवा योग्य पद्धतीने येत नाही आणि कूलिंग कमी होते. यामुळे फ्रिजमध्ये वास येतो.

५. फ्रिजचे दार उघडले तरी ते काम झाले की लगेचच बंद करा. काही जणांना फ्रिजचे दार उघडे ठेऊन एखादे काम करण्याची सवय असते. त्यामुळे फ्रिजमधील गार हवा बाहेर जाते आणि गारवा कमी होतो आणि वस्तू खराब होण्याची शक्यता असते.

६. फ्रिजच्या कूलिंग कमी-जास्त करण्यासाठी त्यामध्ये एक बटण दिलेले असते, त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. दर तीन दिवसांनी डिफ्रोजसाठी दिलेले बटण एकदा दाबा. त्यामुळे फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ कमी होऊन तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

७. फ्रिज भिंतीला चिकटून ठेवू नये. भिंतीपासून काही अंतर ठेऊन फ्रिज ठेवावा. त्यामुळे कॉम्प्रेसरचा आवाज येतो आणि फ्रिज खराब होण्याची शक्यता असते.