माइक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. आता ट्विटरवर तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करुन ऑडिओ ट्विट करु शकणार आहात.

सध्या हे फीचर मर्यादित युजर्ससाठी उपलब्ध असून कंपनीने iOS डिव्हाइससाठी हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. येत्या आठवड्यांमध्ये हे फीचर सर्व iOS डिव्हाइसवर उपलब्ध होईल. अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी हे फीचर केव्हापर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. पण, लवकरच हे फीचर अँड्रॉइड फोनसाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कसा करायचा वापर? :-
व्हॉइस ट्विट करण्यासाठी iOS युजर्सना न्यू पोस्टवर टॅप करावं लागेल. तिथे कॅमेऱ्याच्या बाजूला असलेल्या ऑडिओ रेकॉर्ड पर्यायावर टॅप केल्यास युजरला व्हॉइस नोट रेकॉर्ड करता येईल. यानंतर ‘डन’ बटणावर टॅप करुन शेअर करता येईल. व्हॉइस ट्विटमध्ये युजर्स 140 सेकंदांपर्यंत ऑडिओ रेकॉर्ड करुन ट्विट करु शकतो. जर ही मर्यादा ओलांडली तर नवीन व्हॉइस नोट सुरू होईल.


एकाच ट्विटमध्ये टेक्स्ट आणि व्हॉइस नोट :- 
सध्या ट्विटरवर मेसेज लिहून ट्विट करण्यासाठी 280 कॅरेक्टर्सची मर्यादा आहे. व्हॉइस ट्विट फीचरमध्ये व्हॉइस नोटला नेहमीच्या टेक्स्ट ट्विटसोबत अ‍ॅड करता येईल. म्हणजे एकाच ट्विटमध्ये टेक्स्ट आणि व्हॉइस नोट दोन्ही वापरता येईल.