करोना व्हायरसची लक्षणं दिसण्याआधीच त्याबाबतची माहिती स्मार्टवॉचच्या मदतीने मिळू शकते, असा निष्कर्ष अमेरिकेच्या ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’च्या अभ्यासकांनी काढला आहे. स्मार्टवॉचद्वारे शरीरात होणारे बदल समजून येतात, ह्रदयाचे ठोके किंवा नस याबाबत सतत माहिती देणारे स्मार्टवॉच किंवा त्यासारख्या अन्य उपकरणांद्वारे करोना व्हायरसची लक्षणं दिसण्याच्या जवळपास नऊ दिवस आधीच शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती मिळते, असा निष्कर्ष स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासकांनी काढला आहे.

5,300 जणांच्या समूहाची पाहणी केल्यानंतर त्यातील 32 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं या अभ्यासातून आढळलं, असं अभ्यासकांनी सांगितलं. 32 पैकी 26 रुग्णांच्या (81 टक्के) ह्रदयाचे ठोके, दररोज पायी चालण्याचं अंतर, किंवा झोपण्याची वेळ यामध्ये बदल झाल्याचं त्यांच्या अभ्यासात समोर आलं. ‘नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग’ पत्रिकेत प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 22 रुग्णांमध्ये लक्षणं समोर येण्याआधीच बदल दिसण्यास सुरूवात झाली. तर, चार रुग्णांमध्ये किमान नऊ दिवस आधी संसर्ग झाल्याची माहिती कळाली. दैनंदिन शारिरीक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या स्मार्टवॉचसारख्या उपकरणांमुळे श्वसनासंबंधित संसर्गाची वेळेवर माहिती मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते हे सिद्ध झाल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.

संसर्गाची माहिती सुरूवातीलाच मिळाल्याने तो रोखण्यास मदत होईल. तसेच त्यामुळे एखादी व्यक्ती स्वतः विलगीकरण करू शकते किंवा वेळेवर उपचार करुन घेऊ शकते, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. अभ्यासकांनी काढलेल्या या निष्कर्षामुळे स्मार्टवॉचचा वापर करणाऱ्यांना करोनापासून बचाव करण्यास मदतच होणार आहे.