22 April 2019

News Flash

क्षयाच्या मुकाबल्यासाठी जीवनसत्त्व ‘ड’ उपयोगी

याच रोगामुळे या काळात १६ लाख रुग्णांचा मृत्यू ओढवला.

प्रतिजैविकांसोबतच जीवनसत्त्व ‘ड’ची मात्रा घेतल्यास फुप्फुसातील बहुऔषध प्रतिरोधक क्षयरोगाच्या (एमडीआर) जीवाणूचा नाश करण्याची प्रक्रिया वेगाने घडण्यास मदत होते, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये एक कोटी लांकांना सक्रिय क्षयरोगाची (अ‍ॅक्टिव्ह टय़ूबरक्युलोसिस अर्थात मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलोसिस या जीवाणूला प्रतिबंध करण्याची शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीची क्षमता संपुष्टात आल्याने फुप्फुस किंवा अन्य भागात क्षयाचा संसर्ग होणे) बाधा झाली. याच रोगामुळे या काळात १६ लाख रुग्णांचा मृत्यू ओढवला.

याबाबत लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाच्या अ‍ॅड्रियन मार्टिन्यूऊ यांनी सांगितले की, ‘बहुऔषधप्रतिरोधक क्षयरोगाचे प्रमाण जगभरातच वाढीस लागले आहे. त्याच्यावर उपचार करणे हे कठीण असल्याचे सर्वानाच माहीत आहे. शिवाय सर्वसाधारण क्षयापेक्षा या क्षयाचे होऊ घातलेले परिणाम भयावह आहेत.’

क्षयरोगावरील उपचारासाठी प्रारंभिक म्हणून वापरल्या जाणाऱ्या किमान दोन प्रभावी औषधांचा परिणाम न होणाऱ्या जिवाणूमुळे बहुऔषधप्रतिरोधक क्षयरोग होतो. जगभरात याचे वर्षांकाठी पाच लाख रुग्ण आढळतात आणि दीड लाख लोकांचा मृत्यू ओढवतो.

बहुऔषधप्रतिरोधक क्षयावर सध्या केले जाणारे उपचार हे प्रदीर्घ, महागडे आणि त्यांच्या गंभीर दुष्परिणामांमुळे विषवत आहेत. अशा रुग्णांसाठी नावीन्यपूर्ण उपचार शोधताना सुरक्षित आणि स्वस्त असलेल्या जीवनसत्त्व ‘ड’चा उपयोग करता येईल. केवळ प्रतिजैविकांवर अवलंबून राहण्यापेक्षा या जीवनसत्त्वाचा वापर करून रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवता येईल, असे मार्टिन्यूऊ यांनी सांगितले.

याबाबतचा अभ्यास ‘युरोपियन रेस्पिरॅटरी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यासाठी संशोधकांनी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इंग्लंडसह आठ देशांतील रुग्णांवर झालेल्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष तपासले. जीवनसत्त्व ‘ड’मध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असली तरी क्षयरुग्णांमधील चाचण्यांच्या निकालात विसंगतीही आढळून आली आहे.

First Published on February 8, 2019 12:39 am

Web Title: vitamin d useful for health