सध्या देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत कोणालाही आपल्या घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये व्हॉट्सअॅपच्या वापरामध्ये या दिवसात मोठी वाढ झाली आहे. अनेक युझर्स करोना व्हायरसशी निगडीत व्हिडीओ आणि माहिती शेअर करताना दिसत आहेत. याव्यतिरिक्त अनेक युझर्स मोठे व्हिडीओही आपल्या स्टेटसवर टाकताना दिसत आहेत.

दरम्यान, आता व्हॉट्सअॅपनं आपला सर्व्हरवरील लोड कमी करण्यासाठी भारतात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता युझर्सना व्हॉट्सअॅप स्टेटसवर मोठे व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. व्हॉट्सअॅपशी निगडीत माहिती देणारी वेबसाईट WABetaInfo यांनी ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपनं आता व्हिडीओ शेअर करण्यासाठी एक टाईम लिमिट निश्चित केलं आहे. त्यामुळे आता युझर्सना १५ सेकंटापेक्षा अधिक व्हिडीओ आपल्या स्टेटसवर अपलोड करता येणार नाही.

हे फिचर केवळ भारतीय युझर्ससाठी आणल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. सर्व्हरवरील लोड आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. सध्या अनेक युझर्सना केवळ १५ सेकंदांचा व्हिडीओ आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवता येत आहे. यापूर्वी ही मर्यादा ३० सेकंदांची होती. आता व्हॉट्सअॅपनं ती अर्ध्यावर आणली आहे.