नवीन वर्षाच्या सुरूवातीला नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे प्रचंड टीका झाल्यानंतर आता इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप  WhatsAppने आपल्या व्यासपीठावर गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. WhatsApp ने गुरूवारी आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी जारी केली आहे. पण यावेळेस युजर्सचा गोंधळ होऊ नये यासाठी शब्दांचा काळजीपूर्वक वापर करण्यात आला आहे.

अ‍ॅपमध्ये एका छोट्या बॅनरद्वारे युजर्सना आपली नवीन पॉलिसी समजावण्याचा WhatsApp चा प्रय़त्न आहे. 15 मे पर्यंत ही पॉलिसी स्वीकारावी लागेल. जानेवारीमध्ये नवीन प्रायव्हसी पॉलिसी जारी केल्यानंतर WhatsApp वर जगभरातून टीका झाली, त्यानंतर कंपनीने नवीन पॉलिसी लागू होण्याची तारीख पुढे ढकलली होती. टीका झाल्यानंतरही कंपनीने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केलेला नाही, तर आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.

पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून देण्यात आलं आहे. तसेच, नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय. ‘तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने दिलं आहे. तसेच, नवीन पॉलिसी 15 मेपासून लागू होईल, असं व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आलंय.

आणखी वाचा- समजून घ्या : WhatsApp च्या नवीन धोरणांमुळे कोणती माहिती जाहीर होणार?

दरम्यान, नवीन पॉलिसी आणल्यापासून WhatsApp ला रामराम ठोकणाऱ्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं असून सिग्नल, टेलिग्राण आणि संदेश यांसारख्या अ‍ॅप्सवरील युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे.