थंडीला आता सुरुवात होत आहे. थंडीत त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मॉइश्चरायझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. या थंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी काही टिप्स

त्वचा खोलवर मॉश्चराईज ठेवणे गरजेचे : थंडीत रुक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्याप्रकारे काळजी घेण्यासाठी ‘स्किन केअर’ ट्रीटमेंट घेणे शक्य नसल्यास ‘कोको बटर क्रिम’चा वापर करणे उत्तम राहील. या क्रिमच्या वापराने केवळ शरिराला सुगंधच प्राप्त होतो असे नाही, तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीपूर्वी ऑलिव्ह ऑइलने शरिराला हलक्या हाताने मसाज करणे. यामुळे शरिरातील मॉश्चर कायम राहाण्यास मदत होऊन त्वचा मऊ राहते. चेहऱ्यासाठी त्वचेतील ओलावा कायम ठेवणाऱ्या क्रिमची निवड करा.

मुलायम ओठांसाठी : अनेकजण फुटलेल्या ओठांना पेट्रॉलियम जेली लावतात. परंतु, हा पर्याय खरोखरीच योग्य आहे का ही विचार करण्याची गोष्ट आहे. त्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ उत्पादनांचा वापर करावा. याच्या वापराने त्वचेतील ओलावा कायम राहाण्याबरोबरच सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव होण्याबरोबरच चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होण्यासदेखील मदत होते.

पायांच्या भेगांवरील उपाय : पायांच्या भेगांना थंडीत शरीरातील ओलावा कमी होत असल्याने प्रामुख्याने त्वचेवर याचा विपरित परिणाम होतो. थंड हवामानाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो तो टाचांवर. पायांवरील भेगामुंळे काहींना तर चालणेदेखील कठीण होते. रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरिन आणि गुलाब पाण्याने रोज हलका मसाज घेतल्यास आश्चर्यकारक फरक जाणवेल.