तिचं जग
‘असे कपडे घालू नकोस’, ‘नातेवाईकांकडे जाताना जरा बरे कपडे घाल’, ‘ड्रेस नको; साडीच नेस’ हे आणि असे अनेक आदेश स्त्रियांना दिले जातात. त्यांनी कसे कपडे घालायचे यावर अनेक निर्बंध लागू असतात. पण त्यांना कपडे निवडीचं स्वातंत्र्य जपायचं असेल तर?

प्रसंग एक…

our identity is hindu say rss chief mohan bhagwat
अभिमानाने म्हणा आपण हिंदू आहोत! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन
Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..
Constitution of India
संविधानभान: संविधानाचे चिरंतन मूल्य

‘चल निघू या, आय अॅरम रेडी’, मुलगी.

‘हो चल, अगं पण अशी येणारेस का तू?’ आई.

‘अशी म्हणजे?’ मुलगी.

‘हा असा स्लिव्हलेस कुर्ता घालून?’ आई

‘सो व्हॉट?’ मुलगी.

‘अगं आपण पुजेला जातोय. तिथे असं स्लिव्हलेस घालून आलीस तर तिथे काकू, आत्या वगैरे काय म्हणतील?’ आई.

आईच्या या प्रश्नावर तिचा नाईलाज झाला आणि कुर्ता बदलून ती पूजेला गेली.

’ ’ ’

प्रसंग दोन…

‘आई, ट्रेनने जायचंय तर मी ड्रेसच घालते. ट्रेनच्या गर्दीत साडी नकोशी वाटते.’ सून

‘तिथे सगळ्या साडय़ांमध्ये असणार आणि तू ड्रेसमध्ये? कसं दिसेल ते?’ सासू.

‘बरं, मग तिथे जाऊन साडी नेसते. चालेल ना?’ सून.

‘हो, हे चालेल.’ सासू.

‘कसं दिसेल ते?’ या प्रश्नाचा विचार करायला भाग पडलेल्या सुनेने तिच्या सोयीचे कपडे बाजूला ठेवले.

’ ’ ’

प्रसंग तीन…

‘आता घरात घालण्यासाठी दोन-चार गाऊन किंवा साधे कुर्ते घेऊन ठेव. लग्न झाल्यानंतर सासरी घालायला बरं. तिथे काय तू थ्री-फोर्थ आणि टी-शर्ट घालणारेस?’ लग्न ठरलेल्या मुलीची आत्या.

‘मला तेच बरं पडतं गं. हवं तर थ्री फोर्थ न घालता फुल पॅण्ट घालेन. मग तर झालं!’ मुलगी.

‘अगं, सासरचे काय म्हणतील?’ आत्या.

‘कशाला काय म्हणतील?’ मुलगी.

‘लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तरी कुर्ते वगैरे घाल. मग तुझ्या सासूला विचारून नंतर काय ते ठरवं बाई.’ आत्या.

यावर मुलीने ‘बरं’ या आशयाची मान डोलावली आणि गप्प बसली.

’ ’ ’

या तिन्ही प्रसंगांतील मुलगी, सून आणि लग्न ठरलेली मुलगी या तिघींनी त्यांची सोय आणि आवड लक्षात घेऊनच त्यांना कोणते कपडे घालायचे आहेत हे ठरवलं. त्यांनी ते फक्त ‘ठरवलं’ होतं. प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्या आई, आत्या आणि सासूने सांगितलेलंच केलं, किंबहुना त्यांना ते करावं लागलं. असे अनेक प्रसंग घरीदारी बघायला मिळतात. पण वरील तिन्ही प्रसंग प्रातिनिधिक आहेत. त्या प्रसंगांचं नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की तिघींनाही कपडय़ांबद्दल बोलण्याऱ्या व्यक्ती या स्त्रियाच आहेत. मुलीने कुठे, कधी, कसे कपडे घालावे यावर अनेक र्निबध घातले जातात आणि ते बहुतांशी वेळा आधीच्या पिढीतील स्त्रीकडून आलेले असतात. खरं तर त्यात पूर्णपणे त्या स्त्रीचा दोष नाही. तिला आजवर जे सांगण्यात आलं तेच ती तिच्या पुढच्या पिढीला सांगतेय. म्हणजेच पिढय़ान्पिढय़ा येत गेलेले काही र्निबध काळानुसार बदललेच नाहीत. किमान त्यामागची मानसिकता आजही काही प्रमाणात तशीच आहे. ‘लोक काय म्हणतील’च्या नादात त्या मुलीची सोय आणि आवड हे दोन्ही मागे टाकलं जातं. हे ‘लोक’ आपल्या मानसिकतेतच असतात असं वाटतं. ते त्या मानसिकतेत इतके चिकटून बसलेले असतात की सतत ‘लोक काय म्हणतील’ हा विचार सगळ्यात महत्त्वाचा वाटू लागतो. मग प्रश्न पडतो की, आपण नेमकं कोणासाठी जगतो? त्या लोकांसाठी की स्वत:साठी?

ट्रेन, बस किंवा अन्य प्रवासात, नोकरीच्या ठिकाणी, सोसायटीत एखादी स्त्री नटूनथटून चांगले कपडे घालून आली असेल तर तिच्याकडे स्त्रियाच इतकं निरखून बघतात त्या मुलीला ‘आपल्या पेहरावात काही गडबड तर झाली नाही ना’ अशी शंका येऊ लागते. मग तिने वन पीस घातलेला असो किंवा साडी; तिचा वनपीस किती तोकडा आहे किंवा ब्लाऊजचा मागचा गळा किती मोठा आहे अशी शेरेबाजी एकमेकींमध्ये खुसफुस करत केली जाते. म्हणजेच काय तर पेहराव कोणताही असो तो जरा नेहमीपेक्षा वेगळा दिसला की त्याकडे बघण्याच्या नजराही वेगळ्या होतात. ‘आता लग्न झालं तिचं; शोभतं का तिला हे असं’ असं म्हटलेलं अनेकांनी अनेकदा ऐकलं असेल. लग्न झालंय म्हणून काय झालं? तिची आवड बदलणार की काय? लग्नानंतर शरीररचनेत थोडे बदल होतात, तिच्या वजनातही थोडाफार बदल होतो; हे मान्य आहे. पण म्हणून तिने तसे कपडे घालायचेच नाहीत का? तिला तिच्या आताच्या वजनानुसार, साइजनुसार तिच्या आवडीचे कपडे अगदी सहज मिळू शकतात. त्यामुळे उगाच तिच्या वजनाचा, आकाराचा संबंध तिच्या कपडे घालण्याच्या सवयी आणि आवडीशी लावणं निर्थक आहे.

कपडय़ांची निवड हा तिच्या सोयीचा भाग आहे. ज्या कपडय़ांमध्ये तिला सहज वावरता येत असेल त्याच कपडय़ांची निवड ती करते. मग ती हा विचार करत नाही की तिचं लग्न झालं आहे की ती दोन मुलांची आई आहे ते! जोवर तिला त्या कपडय़ांमध्ये आरामदायी, मोकळं वाटतंय आणि तिला ते सांभाळता येतंय तोवर तिला ‘असे कपडे घालू नकोस आणि तसेच घाल’ हे म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही. एखाद्या मुलीने बराच तोकडा वन पीस घातला असेल तर त्या मुलीला बहुतांश वेळा ‘काय हे किती तोकडे कपडे घातलेत’ असंच ऐकावं लागतं. पण तीच मुलगी तिचा पेहराव अतिशय सफाईदारपणे सांभाळत असेल, आत्मविश्वासाने वावरत असेल, हालचाल करत असेल तर तिचं ते कौशल्यच म्हणावं लागेल.

आपल्याकडे कुठे कोणते कपडे घालायचे याचं एक समीकरणच तयार केलेलं असतं. पारंपरिक कारणांसाठी कुर्ता किंवा साडी; त्यातही ती सून असेल तर साडी हवीच. एखाद्याच्या वाढदिवसाच्या ठिकाणी त्याच सुनेला पंजाबी ड्रेस किंवा कुर्ता घालायची परवानगी असते; पण लाँग वन पीस, जीन्स टॉप असं काही घालायचा विचार तिने मांडला तर ती किती भयानक काहीतरी सुचवतेय अशा नजरेने तिच्याकडे पाहिलं जातं. घरातल्याच कोणाच्या तरी लग्नात तिने शरारा घातला की अनेकांच्या भुवया उंचावतात. आता खरंतर शरारामध्ये तसं भुवया उंचावण्यासारखं काहीच नाही. पण तरी त्याचे चेहरे बोलत असतात. काही कपडय़ांमध्ये अंगप्रदर्शन होतं म्हणून मुलींना काही प्रकारचे कपडे घालण्यापासून रोखलं जातं. पण मग अंगप्रदर्शन तर साडीमध्येही होतंच. किंबहुना जीन्स, कुर्ता यांच्या तुलनेत त्यातच जास्त होत असतं. मग तरीही साडीला संस्कृतीचं प्रतीक वगरै मानली जाते. साडीला वेगळं महत्त्व, दर्जा आहे, हे नाकारायचं नाही. ते आहेच. पण कोणतीही शहनिशा न करता केवळ अंगप्रदर्शन म्हणून काही पेहराव नाकारणं आणि मुलींना ते घालण्यापासून रोखणं हा हिशेब मुळीच मान्य नाही.

अत्याचार, बलात्कार, विनयभंग, छेडछाड यांसारख्या घटना घडल्यावर हळहळ व्यक्त करणाऱ्यांपैकीच काहीजण त्या घटनेसाठी त्या मुलीला, तिने घातलेल्या कपडय़ांना दोष देतात. असे कपडे घातले की असंच होणार, असे शहाणपणाचे डोस इतरांना देत असतात. त्या मुलीने कसे कपडे घातले होते याची खात्री न करताच सरसकट विधान केलं जातं. काही वर्षांपूर्वी काही राज्यांमधील ठिकठिकाणच्या गावांमध्ये मुलींनी कसे कपडे घालावे याचा फतवा काढला गेला होता. कारण काय तर मुलींच्या जीन्स घालण्याने छेडछाडीचे प्रसंग वाढले आहेत. असे प्रसंग कमी करण्यासाठी मुलींच्या कपडय़ांवर र्निबध आणि अटी घातल्या जातात; पण मुलांच्या वागणुकीवर शून्य ताबा! एखादी समस्या योग्य मार्गाने सोडवली की सुटते. इथे मार्गच चुकलाय. मुलींच्या कपडय़ांवर र्निबध घालूनही छेडछाड, बलात्कार, विनयभंग, अत्याचाराच्या घटना आजही घडत असतील तर त्या समस्यांचं मूळ हे त्या मुलीच्या कपडय़ांत नसून पुरुषी वृत्तीत आणि नजरेत आहे. आणि ती काढून टाकण्यासाठी मुलीच्या कपडय़ांकडे बोट न दाखवता त्या वृत्तीकडे दाखवायला हवं.

इतर गोष्टींप्रमाणेच स्त्रीला कपडे घालण्याबाबतही निवडीचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य जपताना तिने मात्र ठाम राहायला पाहिजे. तिच्या या रस्त्यात तिला अडवणारे अनेक प्रश्न येतील त्यांना चोख उत्तरं तिला देता यायला हवीत. यातले अनेक अडथळे हे स्त्रियांकडूनच येतात. हे अडथळे शेरेबाजीच्या रूपातून समोर येतात किंवा हावभावांवरून व्यक्त होतात. ते अचूक ओळखून तिने तिच्या निवडीचं स्वातंत्र्य पटवून द्यायला हवं. कपडय़ांवरून तिच्या चारित्र्यावर भाष्य केलं जातं. ‘तोकडे कपडे घालते म्हणजे तिचं कॅरेक्टर काही बरोबर नाही’ असं अगदी सहज म्हटलं जातं. पण चारित्र्य कपडय़ांवरून ठरत नाही हे न समजणाऱ्यांच्या वृत्तीची कीव करावीशी वाटते. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या तीन मूलभूत गरजा. या तिन्ही गरजांची पूर्तता होण्यासाठी माणूस नेहमी सगळ्यात आधी त्याची सोय बघत आलाय. आताही तेच करतोय. आता या सोयीला जोड आहे ती आवडीची. म्हणूनच घर घेताना सर्व सोयीसुविधांनी युक्त असं घेतलं जातं. तर अन्नसेवन करताना वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा प्रयोग करतं. मग वस्त्राच्या बाबतीतही तसंच होणार हे गृहीत आहे. स्त्री आधुनिक जगात वावरत असल्यामुळे ती आधुनिक कपडे घालते असं नसून तिला तिच्या निवडीच्या स्वातंत्र्याची जाणीव झाली आहे, असं आहे. आणि म्हणूनच ती त्या जाणिवेने तिचं स्वातंत्र्य जपतेय, इतकंच!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा