घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांची तारेवरची कसरत ठरलेलीच. सकाळी उठल्यापासून घरातील सगळ्यांचा चहा, नाष्ता, स्वयंपाक डबे भरणे इतर कामे, मुलांची धावपळ आणि स्वत:चे आवरणे सुरु असते. हे सगळे करुन ऑफीस गाठायची घाई ठरलेलीच. या सगळ्यामध्ये महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. घाईमध्ये नाष्ता करायचा राहून जातो. अनेकदा राहीलेले शिळे अन्न खाण्याकडे महिलांचा कल असतो. यामुळे शरीराला आवश्यक असणारी पुरेशी पोषक तत्त्वे मिळत नाहीत. विविध कारणांमुळे खाण्याच्या वेळा चुकणे, बाहेरचे खाणे असे बऱ्याचदा होते. पण घरातील महिलेचे आरोग्य चांगले असेल तर घराचे आरोग्य चांगले राहते असे म्हणतात, त्यामुळे महिलांनी आपल्या आहाराच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला हवी…

नाश्ता

सकाळी कितीही घाई असेल तरीही नाश्ता अजिबात चुकवू नये. उठल्या उठल्या चहा घेतल्याने भूक मरते आणि नंतर ऑफीसला जाण्याच्या घाईमध्ये नाश्ता करायचा राहून जातो. पण रात्री १० तासांहून अधिक काळ पोट रिकामे असल्याने सकाळी नाश्ता करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यातही जंक फूड अजिबात नको तर शरीराला प्रथिने आणि इतर आवश्यक घटक देणारा आहार जास्त चांगला. यामध्ये पराठा, पोळी, थालिपीठ, भात, धिरडी अशा प्रकारचा आहार घ्यावा. नाश्ता करताना त्यात एक अंडे, एखादे फळ आणि एक दूध असल्यास जास्त चांगले.

दुपारचे जेवण

वर्किंग वूमन दुपारचे जेवण ऑफीसमध्येच करतात. साधारणत: डब्यामध्ये पोळी आणि भाजी असते. यामworking women should give attention towards their diet ध्ये भाजी पातळ असल्यास जास्त चांगले. त्यासोबतच सॅलेड, दही या पदार्थांचा दुपारच्या जेवणात समावेश असल्यास उत्तम. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषणतत्वे मिळण्यास मदत होते.

संध्याकाळचे खाणे

दुपारी साधारण १ ते २ च्या दरम्यान जेवल्यानंतर सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान भूक लागते. या वेळात अनेकांना चहा घेण्याची सवय असते. जास्तच भूक लागली तर चहासोबत बिस्कीटे खाल्ली जातात आणि वडापाव, सामोसा यांसारखे जंकफूडही खाल्ले जाते. पण अशी भूक लागलेली असताना कडधान्ये, पोहे, उपीट, घरी केलेला चिवडा, पौष्टीक लाडू असे काही खाल्ल्यास पोटही भरते आणि शरीराचे पोषण होऊन आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

रात्रीचे जेवण

संध्याकाळी काही खाल्ले नसेल तर रात्री दणकून भूक लागते. त्यामुळे भरपेट जेवण्याची सवय असते. मात्र घरी गेल्यावर स्वयंपाक करुन जेवायला बसेपर्यंत उशीर होतो. त्यातही अनेकांकडे रात्री भात खाण्याची पद्धत असते. मात्र रात्री जास्त भात खाणे चांगले नाही असे आहारतज्ज्ञ सांगताना दिसतात. तसेच रात्रीच्यावेळी मसालेदार, दिर्घकाळ न पचणारे जड अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे रात्री लवकर जेवावे आणि हलका आहार घ्यावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)