चीनमधील दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या China Unicom ने Ziguang या समूहासोबत भागीदारी करत 5G सीम कार्ड लाँच केले आहे. जगातील पहिलं 5जी सीम कार्ड असल्याचा कंपनीचा दावा आहे. सद्यस्थितीत 4G LTE सीम कार्डचा वापर सर्वाधिक केला जातो. 128/256 KB इतकीच या सीम कार्डची स्टोरेज क्षमता आहे. यामध्येही SMS आणि कॉन्टॅक्ट सेव्ह होतात. मात्र, 5जी सीम कार्डमध्ये तब्बल 1 टीबी इतकी या सीम कार्डची क्षमता असणार आहे.

जास्त क्षमतेमुळे या सीममध्ये व्हिडिओ, म्युझिक सारख्या मोठ्या फाइल्सही स्टोर करता येणे शक्य होणार आहे. हे सीम कार्ड एंटरप्राइज ग्रेड इनक्रिप्शन सिस्टिमनुसार आहेत. त्यामुळे युजर्सना अतिरीक्त डेटा प्रोटेक्शन मिळेल. हे सीम कार्ड नेमकं कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी वर्षाखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5 जी कनेक्टिव्हीटी असणाऱ्या फोनमध्येच या सीमकार्डचा वापर करता येणार आहे. चायना युनिकॉम कंपनी 5जी नेटवर्क ऑक्टोबर 2019मध्ये लाँच करणार आहे. हे पहिलं 5जी सीम कार्ड 32 जीबी, 64 जीबी आणि 128 जीबीच्या पर्यायासह उपलब्ध होणार आहे. आगामी काळात या सीम कार्डच्या स्टोरेजची क्षमता 512 जीबी आणि 1 टीबी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.