कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन आणणारी शाओमी कंपनी गेल्या काही वर्षांमध्ये भारतात बरीच लोकप्रिय ठरत आहे. आपली घोडदौड कायम राखत या कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी भारतीय मोबाइल बाजारपेठेत सॅमसंग कंपनीला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलंय. ‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालानुसार 2019च्या दुसऱ्या तिमाहीत शाओमीचा देशातील स्मार्टफोन बाजारात हिस्सा 28 टक्क्यांवर आला आहे. उलट गेल्या वर्षी कंपनीचा बाजारहिस्सा 31 टक्के होता. तरीही ते अव्वल क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेल्या Realme कंपनीने देखील लक्षणीय आगेकूच केल्याचं पाहायला मिळत आहे. या कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हिस्सा 9 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी Realme चा बाजारातील हिस्सा 7 टक्के होता. दोन टक्क्यांच्या वाढीसह Realme ने या यादीत चौथा क्रमांक पटकावलाय. दुसऱ्या क्रमांकावर 25 टक्के हिस्सा असलेली सॅमसंग आणि तिसऱ्या क्रमाकावर 11 टक्के हिस्सा असलेली विवो कंपनी आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर ओप्पो ही कंपनी आहे. ओप्पोचा देशातील स्मार्टफोन बाजारातील हिस्सा 8 टक्के आहे.

फीचर फोन बाजारात रिलायंस जिओचा दबदबा –

फीचर फोन सेगमेंटमध्ये रिलायंस जिओ 28 टक्के मार्केट शेअरसह अव्वल ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर 21 हिस्सा असलेली सॅमसंग कंपनी आहे. त्या खालोखाल 12 टक्के, 10 टक्के आणि 9 टक्क्यांसह अनुक्रमे लावा, इंटेल आणि नोकियाचा क्रमांक लागतो.