चीनची कंपनी शाओमीने भारतीय बाजारपेठेत आपले चार नवे टिव्ही लाँच केले आहेत. मंगळवारी पार पडलेल्या ‘स्मार्टर लिविंग 2020’ मध्ये कंपनीने हे टिव्ही लाँच केले. यावेळी कंपनीने ६५ इंचाचा Mi TV 4X हा चारपैकी सर्वात मोठा टिव्ही लाँच केला. याव्यतिरिक्त शाओमीने ४३ इंचाचा आणि ५० इंचाचा Mi TV 4X आणि ४० इंचाचा Mi TV 4A बाजारात आणला आहे. याव्यतिरिक्त या टिव्हींच्या सोबतीला Xiaomi साऊंड बारचे ब्लॅक कलर व्हेरिअंटदेखील लाँच केले.

६५ इंचाच्या Mi TV 4X टिव्हीची किंमत भारतीय बाजारपेठेत ५४ हजार ९९९ रूपये तर ५० इंचाच्या टिव्हीची किंमत २९ हजार ९९९ रूपये निश्चित करण्यात आली आहे. तर ४३ इंचाच्या टिव्हीची किंमत २४ हजार ९९९ रूपये आणि ४० इंचाच्या टिव्हीची किंमत १७ हजार ९९९ रूपये ठेवण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून या टिव्हीचा सेल सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, शाओमीच्या साऊंड बारचे ब्लॅक व्हेरिअंट ४ हजार ९९९ रूपयांना विकत घेता येऊ शकते.

शाओमीने ६५ इंचाचा Mi TV 4X टिव्ही लाँच केला आहे. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणारा सर्वात मोठा आणि सर्वात उत्तम असा Mi TV असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या टिव्हींपैकी ४० टक्के अधिक सर्फेस एरिया ६५ इंचाच्या टिव्हीमध्ये उपलब्ध असेल असं कंपनीने सांगितले आहे. तसेच ६५ इंचाच्या टिव्हीमध्ये कंपनीकडूनच इनबिल्ट नेटफ्लिक्स देण्यात आले आहे. तसेच Vivid Picture Engine सोबत येणारा हा पहिला टिव्ही असेल. याव्यतिरिक्त टिव्हीमध्ये अल्ट्रा स्लिम बेझल डिझाईन आणि डॉल्बी ऑडिओ देण्यात आला आहे. तसेच हा टिव्ही अँड्रॉईड ९.० वर चालणार असून यात 4K HDR 10-बिट डिस्प्ले देण्यात आला आहे.

काय असेल विशेष ?
६५ इंचाच्या टिव्हीमध्ये डेटा सेव्हर फिचर देण्यात आले आहे. तसंच यामध्ये नव्याने डिझाईन केलेले २० वॅटचे स्पीकर असतील. याव्यतिरिक्त युझरला ७ लाख तासांचा कंटेट ऑफर करणार आहे. ६५ इंचाच्या टिव्हीमध्ये क्वाड कोअर कॉर्टेक्स A-55 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच अँड्रॉईड डेटा सेव्हरवर चालणारा पहिला टिव्ही असेल. 40 इंचाच्या Mi TV 4A मध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला असून यातही २० वॅटचे स्पीकर देण्यात आले आहेत. हा टिव्हीदेखील ७ लाख तासांचा कंटेट ऑफर करणार आहे.