चीनची शाओमी कंपनी आता भारतात लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्रीच्या तयारीत आहे. Xiaomi भारतात 11 जून रोजी Mi Notebook लाँच करणार आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी याबाबत माहिती दिली.

11 जून रोजी दुपारी 12 वाजता Mi Notebook साठी लाँच इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. लाँच इव्हेंट शाओमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि Mi.com वर लाइव्ह बघता येईल. Mi Notebook ची भारतात HP, Dell आणि Lenovo यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा असेल. या लॅपटॉपसोबत शाओमी भारतात पहिल्यांदा लॅपटॉप सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत आहे, पण कंपनीने ‘मी’ आणि ‘रेडमी’ ब्रँडअंतर्गत चीनमध्ये अनेक लॅपटॉप लाँच केले आहेत. यामध्ये Mi Gaming Laptop, Mi Notebook Air, आणि Mi Notebook Pro 15 यांचा समावेश आहे.

भारतीय ग्राहकांचा विचार करुन Mi Notebook ची निर्मिती करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. हा लॅपटॉप म्हणजे ‘मेड फॉर इंडिया’ असल्याचं मनु कुमार जैन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. यासोबत जैन यांनी एक टीझर पोस्टरही शेअर केलं आहे. या पोस्टरनुसार हा लॅपटॉप अत्यंत स्लिम असेल हे स्पष्ट होतंय. पण, यामध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये कंपनी टीझरद्वारे लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देऊ शकते.

यापूर्वी, शाओमी RedmiBook सीरिज भारतात लाँच करेल अशी चर्चा होती. पण जैन यांच्या ट्विटमध्ये केवळ Mi Notebook मॉडेलच्या लाँचिंगबाबतच माहिती आहे. चीनमध्ये शाओमीने रेडमीबुक लाइनअपमध्ये RedmiBook 13, RedmiBook 14, आणि RedmiBook 16 यांसारखे मॉडेल्सही लाँच केले आहेत.