मोबाईल हा सध्या आपल्या सगळ्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग झाला आहे. झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतांश कामांसाठी आपल्याला मोबाईल लागतो. अनेकदा काही महत्त्वाचे काम असले की हा फोन अचानक खूप स्लो काम करतो, मधेच हँग होतो. अशावेळी आपली बरीच चिडचिडही होते, पण ही चिडचिड टाळण्यासाठी आधीपासूनच काळजी घेतल्यास फायद्याचे ठरते. आता फोन स्लो होऊ नये म्हणून नेमके काय करावे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण काही सोप्या युक्त्या पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा फोन सारखा स्लो होणार नाही आणि घाईच्या वेळी कामात अडचणी येणार नाहीत.

जाहिरातींपासून सुटका करुन घ्या

जाहिरातींनी हा आपल्या आयुष्यातील मोठा भाग व्यापला आहे. विविध माध्यमांतून वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती अगदी सामान्य झाल्या आहेत. आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलमध्येही हल्ली सतत विविध जाहिराती येत असतात. स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या या जाहिराती आपल्याला अनेकदा नकोशा होतात. प्रमाणापेक्षा जास्त जाहिराती येत असतील तर तुमचा फोन हँग होण्याची शक्यता असते. तसेच एखादे काम करताना मधेच जाहिरात आली तरीही नको होते. अशावेळी फोनमध्ये एक विशेष सेटींगची सविधा असते जी केल्यामुळे जाहिरातींपासून सुरक्षित राहता येईल. Settings > Google > Ads > Opt out of Ads Personalization ला ऑन करा. यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर येणाऱ्या अॅड्स दिसणार नाहीत.

व्हॉटसअॅप आणि इतर मेमरी डिलीट करत राहा

आपण व्हॉटसअॅप सध्या मोठ्या प्रमाणावर वापरतो. कधी ऑफीसच्या कामासाठी तर कधी वैयक्तिक वापरासाठी वापरले जाणारे हे अॅप्लिकेशन जास्त मेसेजेसमुळे मर्यादेपेक्षा जास्त मेमरी वापरते. यामध्ये येणारे फोटो, व्हिडियो आणि इतरही अनेक फाईल्स यामुळे फोन स्लो होऊ शकतो. त्यामुळे व्हॉटसअॅप किंवा इतरही सोशल नेटवर्किंगसाठी वापरली जाणारी अॅप्लिकेशन्स वेळच्य़ा वेळी क्लिन करा. त्यामुळे फोनमधील इतर गोष्टी वेगाने चालण्यास सुरुवात होईल.

व्हायरसपासून बचाव करा

व्हायरस हा लॅपटॉप किंवा स्मार्टफोनसाठी अजिबात चांगला नसतो. स्मार्टफोनमध्ये एखादा व्हायरस गेल्यास हे डिव्हाईस कधी बंद पडते तर कधी स्लो होते. आपण अनेकदा मोबाईल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला जोडत असतो. त्यावेळी किंवा कोणाकडून काही डेटा ट्रान्सफर करुन घेताना आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस जाण्याची शक्यता असते. अशावेळी आपण मोबाईलचा व्हायरसपासून बचाव करायला हवा. नाहीतर फोन वारंवार हँग होण्याची शक्यता असते. यासाठी Settings > Google > Security > Google Play Protect > Turn on या क्रमाने सेटींग्जमध्ये बदल करा.