लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप YouTube च्या नियमात महत्त्वाचा बदल होतोय. नव्या नियमानुसार, जर युजरचं अकाउंट ‘व्यावसायिकरित्या व्यवहार्य’ नसेल तर कंपनी त्या युजरचा अकाउंट अ‍ॅक्सेस बंद करेल. म्हणजेच, जर तुमच्या अकाउंटद्वारे आर्थिक उत्पन्न होत नसेल तर युट्यूब तुमचं अकाऊंट किंवा चॅनल डिलीट करेल. या नव्या नियमावर कंटेंट क्रिएटर्सकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

10 डिसेंबरपासून YouTube साठी हा नवा नियम लागू होत आहे. जर युट्यूबला तुमच्या चॅनलपासून काहीच फायदा होत नसेल तर तुमचं अकाउंट डिलीट केलं जाईल. या नव्या नियमाबाबत युजर्सना इमेल पाठवून युट्यूबकडून माहिती दिली जात आहे. गेल्या आठवड्यापासून युट्यूबकडून इमेल पाठवण्यास सुरूवात झालीये. तसेच, युट्यूबच्या नव्या नियमांनुसार जर कुणाला त्यांचं चॅनल डिलिट होण्याची भीती असेल तर तुम्ही तुमचा कंटेट डाऊनलोड करुन घ्यावा, असंही युट्यूबने सांगितलं आहे. याशिवाय अकाउंटटं अ‍ॅक्सेस थांबवल्यानंतर युजरला त्याबाबत सुचित केलं जाईल आणि चॅनलवरील कंटेंट इतरत्र सेव्ह करण्यासाठी वेळ देखील दिला जाईल असंही या इमेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

या नव्या नियमावर कंटेंट क्रिएटर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ट्विटरवरुन युट्यूबला ट्रोल करण्याचा प्रयत्न युजर्सकडून सुरू आहे. जे उत्तम व्हिडीओ बनवतात, ज्यांचे बऱ्यापैकी सब्सक्राइबर्सही आहेत, पण त्यांच्या चॅनलद्वारे कमाई होत नाही अशा युट्यूबर्सला या नव्या नियमांचा फटका बसणार आहे. एकूणच जर युट्यूबला तुमच्या चॅनलपासून काहीही फायदा होत नसेल तर तुमचं अकाउंट किंवा चॅनल डिलीट केलं जाईल.