जगातील कोणत्याही गोष्टीचा व्हिडीयो पहायचा असेल तर आपण अगदी सहज युट्यूबवर जाऊन सर्च करतो. कानाकोपऱ्यात घडणारी घटनाही आपण अगदी सहज पाहू शकतो. मात्र आता अशाप्रकारे व्हिडीयो पाहण्यावर काही प्रमाणात बंधन येऊ शकते. याचे कारण म्हणजे युट्यूबने अलिकडेच आपल्या पोर्टलवर असणारे जवळपास ५० लाखांहून अधिक व्हिडीयो डिलीट केले आहेत. आता अशाप्रकारे अचानक व्हिडीयो डिलीट करण्यामागचे नेमके कारण काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर गुगल द्वारे अधिकृत व्हिडिओ शेअरिंग प्लेटफार्मने हे व्हिडीयो बघण्यापूर्वीच डिलीट केले. कंपनीने असे केल्याचे कारण म्हणजे अनुचित कंटेंट पोस्ट केल्यामुळे कंपनीला याआधी अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे २०१७ च्या शेवटच्या तीन महिन्यात अपलोड केलेले हे व्हिडीयो आम्ही डिलीट केले असे कंपनीने सांगितले आहे.

युट्यूबवर जगभरातून व्हिडीयो अपलोड करण्यात येत असतात. अनेकदा यातील कंटेंट हा अनुचित असतो. कधी हिंसक तर कधी अश्लील गोष्टींचे व्हिडीयो असल्याने कंपनीला हे पाऊल उचलावे लागते. युट्यूबवर कोणताही व्हिडीयो अपलोड होण्यापूर्वी त्याची योग्य ती शहानिशा केली जाते. त्यामध्ये काही गैर आढळल्यास तो व्हिडीयो प्रसिद्ध करायचा का नाही याचा निर्णय होतो. त्यानुसार अनेक व्हिडीयो अपलोड होण्याआधीच डिलीट करण्यात येतात. मात्र तरीही एखादा व्हिडीयो अपलोड झालाच तर १ व्ह्यू मिळण्यापूर्वीच तो डिलीट केला जातो. एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, ८० लाखापैकी ७६ टक्के व्हिडिओज १ व्ह्यू मिळण्यापूर्वीच डिलीट करण्यात आले. व्हिडीयोमधील कंटेंट योग्य नसल्याने कंपनीला ही कारवाई करावी लागली असे कंपनीकडून सांगण्यात आले.

सध्या युट्यूबवर असणाऱ्या व्हिडीयोपैकी सुमारे ९३ लाख व्हिडीयो असे आहेत जे युट्युब गाईडलाईन्सचे उल्लंघन करतात. यातील जास्त व्हिडीयो भारतातील आहेत. या क्रमवारीत अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. युट्यूबवर व्हिडीयोजच्या बरोबरीने जाहीरातींनाही खुप महत्त्व आहे. आपल्या जाहीराती चुकीच्या व्हिडीयोंसोबत दिसत असल्याची तक्रार काही नामवंत कंपन्यांनी युट्यूबकडे केली होती. त्यानुसार योग्य ती तपासणी करत युट्यूबने हे व्हिडीयो डिलीट करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये अॅडिडास, अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्सबरोबरच जवळपास ३०० कंपन्यांचा समावेश आहे.