लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप झूम भारतात चांगलंच लोकप्रिय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने झूमला टक्कर देण्यासाठी JioMeet व्हिडिओ अ‍ॅप लाँच केलं. पण, जिओमीट अ‍ॅपचा युजर इंटरफेस, अ‍ॅप आइकॉन आणि फीचर्स झूमशी बरेच मिळतेजुळते आहेत. यावरुन आता जिओमीटविरोधात झूम कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओविरोधात झूम कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे. “नुकत्याच लाँच झालेल्या रिलायन्स JioMeet आणि झूममधील साम्य पाहून थक्कच झालो”, अशी प्रतिक्रिया झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्सचे भारतातील प्रमुख समीर राजे यांनी दिली आहे. तसेच, “याविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबण्याबाबत कंपनीत अंतर्गत बरीच चर्चा सुरू आहे” असंही त्यांनी सांगितलं. पण, याबाबत अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार देत कारवाईबाबतचा निर्णय आमची लीगल टीम घेईल, असे राजे म्हणाले.

“आम्हाला माहित होतं हे होणार आहे…पण ठिक आहे…कारण स्पर्धकाचा सामना करण्याची ही काही झूमची पहिलीच वेळ नाही. आमचं प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी आमची ताकद आहे. आमचे स्पर्धक काय करतात ती त्यांची स्ट्रॅटजी आहे”, असे राजे म्हणाले. जिओवर कायदेशीर कारवाईबाबत विचारलं असता, “याबाबत अंतर्गत खूप चर्चा सुरू आहे. पण मी यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. कारण हे प्रकरण माझ्या लीगल टीमचं आहे. ते मी त्यांच्यावर सोपवलं आहे”, असं राजे यांनी सांगितलं. तसेच, झूम ही चिनी नव्हे तर अमेरिकी कंपनी असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा नमूद केलं.