चांगल्या पर्सनॅलिटीसाठी आजकाल अनेकजण कडक इस्त्री केलेले कपडे वापरतात. ऑफिस, कॉलेज किंवा शाळा असो काहीजण इस्त्रीच्या कपड्यांशिवाय घराबाहेर पडत नाहीत. पण कपडे धुतल्यानंतर त्याव खूप सुरकुत्या पडतात ज्यामुळे कपडे खूप चुगळलेले दिसू लागतात, अशा परिस्थितीत काहीवेळा इस्त्रीच्या दुकान जाणे शक्य होत नाही. यात घरी इस्त्री नसल्यामुळे कपडे इस्त्री करायचे तरी कसे असा प्रश्न पडतो. यात जर अचानक पॉवर कट झाल्यास अजूनच दुष्काळात तेरा महिना अशी स्थिती निर्माण होते. मात्र या सर्व गोष्टींचा चिंता सोडा, कारण आज आपण घरच्या- घरी इस्त्रीशिवाय कपडे प्रेस करायचे कसे याच्या टिप्स सांगणार आहोत. ज्या वापरून तुम्ही काही मिनिटात लाईटशिवाय कपड्यांना इस्त्री करु शकता.
व्हिनेगर
कपड्यांवरील चुरगळ्या कमी करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकातील व्हिनेगरचा वापर करु शकता. यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये पाणी, व्हिनेगर आणि हेअर कंडिशनर समान प्रमाणात मिसळा. आता कपडे सरळ ठेवा आणि त्यावर स्प्रे करा. नंतर कपडा हॅन्गरवर टांगून ठेवा आणि पुन्हा एकदा स्प्रे करा आणि सुकवून घ्या. तुमच्या लक्षात येईल की, कपडे कोरडे होताच सुरकुत्या पूर्णपणे गायब झाल्या आहेत. व कपडे प्रेस केलेल्या सारखे दिसत आहेत.
टॉवेल
ही पद्धत तुम्हाला ऐकायला थोडी विचित्र वाटत असेल, पण प्रत्यक्षात कपड्यांवरील सुरकुत्या घालवण्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त आहे. यासाठी एक टॉवेल पाण्यात भिजवून चांगले पिळून घ्या. आता प्रेससाठी टेबलावर कपडे व्यवस्थित पसरवा. यानंतर ओल्या टॉवेलने कपड्यांची घडी चांगली दाबा. शेवटी, कपड्याला हॅन्गरवर सुकविण्यासाठी लटकवा , ज्याने बहुतेक सुरकुत्या कमी होतील.
किटली
कपडे इस्री करण्याची ही सर्वात जुनी पद्धत आहे. जर तुमच्याकडे इस्त्री नसेल आणि लाइटही गेली असेल तर अशाप्रकारे तुम्ही कपड्यांवरील सुरकुत्या काढू शकता. यासाठी एका सपाट तळ असलेली किटली गॅसवर गरम करून घ्या. यानंतर कपड्यावर ती इस्त्रीप्रमाणे फिरवा. अशाप्रकारे काही मिनिटात कपडे पूर्ण प्रेस केल्यासारखे दिसतील.
जड गादी
जड गादीखाली कपडे नीट घडी करून ठेवल्यास त्यावरील सुरकुत्या कमी होतात. यासाठी कपडे धुऊन वाळवल्यानंतर दुमडून ते नीट जड उशी किंवा जड गादीखाली २-३ तास ठेवा. असे केल्याने चुरगळलेले कपडे काही मिनिटात नीट प्रेस केल्याप्रमाणे दिसतात.