नाते प्रियकर-प्रेयसीचे असो वा नवरा-बायकोचे; दोन्ही नात्यांत दोन्ही बाजूंनी समजून घेण्याची वृत्ती असावी. पण, या नात्यांत गुंतलेल्या व्यक्तीची प्रत्येक सवय तुमच्या जोडीदाराला आवडेलच, असं नाही. अनेकदा तुमच्या काही सवयींमुळे तुम्ही जोडीदाराच्या नजरेतून उतरता, जोडीदाराचा विश्वास गमावून बसता. अनेकदा पुरुषांच्या काही सवयी अशा असतात; ज्यामुळे महिला जोडीदार त्यांच्यावर संशय घेतात. अशा वेळी दोघांमधील नातं अवघड होऊन बसतं किंवा तुटण्याच्या मार्गावर येऊन पोहोचतं. त्यामुळे पुरुषांना या सवयी असतील, तर आजपासूनच त्या बदला. आम्ही तुम्हाला पुरुषांच्या अशाच पाच वाईट सवयी सांगत आहोत; ज्या महिलांना अजिबात आवडत नाहीत.
१) भावना समजून न घेणे
महिलांना अनेकदा त्यांच्या जोडीदारानं त्यांचं ऐकावं, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी आणि त्यांना भावनिक आधार द्यावा असं वाटतं. कारण- बऱ्याचदा मुलंही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. अशा वेळी महिला काही शेअर करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पुरुष जोडीदारानंही समजून न घेतल्यास महिलांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. पुरुषांच्या या सवयीमुळे नातं तुटू शकतं.
२) छोट्या-मोठ्या कामांत मदत न करणे
अनेक महिला कुटुंब आणि घराची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतात. अशा वेळी जेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदाराची काही घरगुती कामासाठी गरज भासते, तेव्हा तो मदत करीत नसल्यास ती गोष्ट महिलांना अजिबात आवडत नाही.
समजा तुम्ही बाजारात जात असाल, आणि तुमच्या जोडीदारानं तुम्हाला काही महत्त्वाच्या वस्तू आणायला सांगितल्या आणि त्या आणायला तुम्ही विसरलात, तर तुमच्या निष्काळजीपणावरून जोडीदार चिडतो. अनेक लोक आपल्या जोडीदाराला घरातील लहान-मोठ्या कामांत मदत करतातं ज्यामुळे त्यांचं नातं चांगलं टिकतं.
३) मनमोकळेपणाने न राहणे
कोणतंही नातं प्रेमावर टिकतं. पण जेव्हा नात्यात खूप राग, संशय निर्माण होतो, तेव्हा ते फार काळ टिकत नाही. काही पुरुष सुरुवातीपासूनच मनानं कठोर असतात आणि ते आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करत नाहीत; ज्यामुळे नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो. पुरुषांची ही सवय अनेक स्त्रियांना आवडत नसल्यमुळे त्या भावनिकरीत्या तुमच्याशी ‘कनेक्ट’ होऊ शकत नाहीत. त्यामुळे पुरुषांनी आपल्या पत्नीशी नेहमी मनमोकळेपणाने राहिले पाहिजे. प्रत्येक परिस्थिती प्रेमाने आणि समजून घेतली पाहिजे. जर तुम्ही असे केले नाहीत, तर तुमच्या जोडीदाराला तुमच्याबरोबर आयुष्य घालवताना आनंदी राहता येणार नाही.
४) प्रत्येक गोष्टीत चुकीचे ठरवणे
अनेकदा दिसून येतं की, काही पुरुष प्रत्येक निर्णयासाठी महिलांना दोष देतात किंवा त्यांनाच चुकीचं ठरवतात. पत्नी कोणताही योग्य निर्णय घेऊ शकत नाही, असं त्यांना वाटतं. जर तुम्हीदेखील अशा पुरुषांपैकी एक असाल, तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. अनेक पुरुष पत्नीचं बोलणं, अनुभव, मतं यांकडे दुर्लक्ष करतात. कमी लेखत तिला अपमानास्पद वागणूक देतात. अशानं प्रत्येक वेळी पत्नीचा स्वाभिमान दुखावतो.