How To Know Eggplant Is Fresh : भारतीय घरांमध्ये वांग्यांपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. वांग्याचे भरीत असो किंवा वांग्याची करी सगळेच पदार्थ चवीला चविष्ट असतात. पण, कधी कधी त्यासाठी लागणारी बाहेरून ताजी दिसणारी वांगी आतून कुजलेली असतात. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये भाजी खरेदी करायला जात असाल आणि तुम्हाला कीड नसलेली वांगी कशी खरेदी करायची याबद्दल गोंधळ उडत असेल,तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पुढील काही खास टिप्स फॉलो करून तुम्ही किडे नसलेली ताजी वांगी खरेदी करू शकता…

वांग्याचा पृष्ठभाग तपासा – वांगी खरेदी करताना, त्यांचा पृष्ठभाग तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वांग्याचे साल गुळगुळीत, चमकदार आणि गडद रंगाचे असावे. जर तुम्हाला वांग्यावर तपकिरी किंवा काळे डाग दिसले, तर ते घेऊ नका. कारण- अशी वांगी कुजलेली किंवा त्यात किड्यांचा प्रादुर्भाव असू शकतो. सुरकुत्या पडलेले वांगे घेणे टाळा. कारण- ते जुन्या किंवा खराब झालेल्या वांग्याचे लक्षण आहे.

बिया असणारे वांगे – वांग्यांमध्ये बऱ्याचदा खूप जास्त बिया असतात, ज्यामुळे त्यांची चव खराब होऊ शकते. वांगी खरेदी करताना, तुमच्या हातांनी वांगे हलकेसे दाबून तपासा. जर दाबल्यावर वांगी आतल्या बाजूने आकुंचन पावली, तर त्यात बिया नसतील. जर वांगे जड वाटत असेल, तर त्यात भरपूर बिया असण्याची शक्यता आहे.

देठ तपासा – वांगी खरेदी करताना, प्रथम त्यांचे देठ बारकाईने पाहा. जर तुम्हाला तिथे लहान छिद्रे दिसली, तर त्यात किड्यांचा प्रादुर्भाव असू शकतो. पण, ज्या वांग्यांचे देठ हिरवे, लवचिक असतील, तर ती वांगी ताजी असतात. याउलट कोरडे किंवा तपकिरी देठ असलेली वांगी जुनी किंवा आतून कुजलेली असू शकतात.

वांग्यावरचे डाग – जंतू असलेल्या वांग्यांमध्ये अनेकदा लहान छिद्रे किंवा डाग असतात. तशी वांगी खरेदी करणे टाळा. जर तुम्हाला वांग्याच्या पृष्ठभागावर काही खड्डे किंवा छिद्रे दिसली, तर त्याच्या आतमध्ये जंतू असण्याची शक्यता असते. वांगे दाबून बघा,जर ते मऊ झालेले असेल, तर ते आतून कुजलेले असू शकते.

वांग्यावर रसायनांचा लेप – बऱ्याचदा विक्रेते वांग्यांना मेण किंवा रसायनांचा लेप देतात, जेणेकरून वांगी अधिक चमकदार दिसतील. जर वांगी चमकदार दिसत असतील, तर सावधगिरी बाळगा. त्याला हाताने स्पर्श करून बघा. जर पृष्ठभाग चिकट वाटत असेल, तर त्यावर रसायनांचा लेप असू शकतो. अशी वांगी खरेदी करणे टाळा.