अनेकदा आपल्याला ऑफीस आणि इतर रुटीनमधील गोष्टी करुन वैताग येतो. अशावेळी मनाला फ्रेश करण्याची गरज असते. हास्य सिंहासन यासाठी अतिशय उपयुक्त असे आसन असून ते केल्याने मनाला स्फूर्ती मिळण्यास मदत होते. हे आसन करताना प्रथम पद्मासनात बसावे. मग दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पाठीमागे आणावे. दोन्ही टाचांवर बसावे. टाचा नितंबाला टेकवाव्यात. दोन्ही गुडघ्यात साधारण ६ इंच अंतर ठेवून बसावे. उजव्या हाताचा पंजा उजव्या गुडघ्यावर व डाव्या हाताचा पंजा डाव्या गुडघ्यावर ठेवावा.

हा एक मुखमुद्रा प्रकार आहे. दोन्ही नाकपुडय़ांमधून व तोंडातून श्वास बाहेर सोडत असताना जीभ घशातून आवाज करीत जास्तीत जास्त बाहेर काढावी. जीभ बाहेर काढण्याची क्रिया होत असताना आवाज करत श्वास पूर्णपणे बाहेर सोडावा. डोळे ताणून घ्यावेत. चेहऱ्याचे सर्व स्नायू खेचावेत. दृष्टी नाकाच्या टोकाशी रोखावी. ७ ते ८ सेकंद या स्थितीत रहावे. कंबर ताठ ठेवावी. रोज चार वेळा अशाप्रकारे आरशापुढे ही सिंहमुद्रा करावी. या आसनामुळे चेहरा सुंदर व तेजस्वी बनतो. बोलण्यातील तोतरेपणा कमी होत जातो. स्मरणशक्ती वाढते. घशाच्या तक्रारी दूर होतात.

श्वसन आणि स्वरयंत्रावर या आसनाचा चांगला परिणाम होतो. डोळे, कान व त्वचेचे कार्य सुधारते. डोळ्यांना व्यायाम मिळतो. त्वचा तेजस्वी होते. टॉन्सिल्सच्या तक्रारी दूर होतात. आवाज बसला असेल तर तो सुधारतो. छातीचे रोग बरे होतात. फुफ्फसाचे कार्य नीट चालू होते. हास्य सिंहासनामुळे श्वसन संस्था सुधारते. स्वरयंत्र संस्था, योग्यप्रकारे कार्य करू लागते. या आसनामुळे चेहऱ्यावरच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. डोळे, गाल, हनुवटी, जीभ, ओठ, कपाळ सर्वच भाग ताणले जातात. त्यामुळे या सर्व अवयवांमध्ये रक्ताभिसरण सुधारते. वज्रासनामुळे मिळणारे फायदे देखील या आसनामुळे मिळतात. म्हणून याला मुखमुद्रावज्रासनही म्हटले जाते. कोणी याला भैरवासनही म्हणतात. छातीच्या आणि पोटाच्या सर्व तक्रारी या आसनामुळे दूर होतात.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ