Vastu Tips For Broom: हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रातही झाडूशी संबंधित अनेक नियमदेखील सांगितले जातात. या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने घरात अनेकदा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, असे म्हटले जाते. लोक अनेकदा निष्काळजीपणे घरात कुठेही झाडू ठेवतात; परंतु वास्तुशास्त्रात झाडू ठेवण्याचे विशिष्ट नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्याने सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तर, वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू ठेवण्याचे नियम आणि योग्य दिशा जाणून घेऊया.

झाडूला पायांनी स्पर्श करू नका

पूर्वी घरातील आजी-आजोबा झाडूला पाय लावू नये, असे सांगायचे. खरं तर वास्तुशास्त्रानुसार झाडूला कधीही पाय लावू नये. ते देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून झाडूचा अनादर करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अनादर आहे. जर तुम्ही चुकून झाडूला पाय लावला, तर लगेच झाडूच्या पाया पडावे.

झाडू नेहमी लपवून ठेवा

बरेच लोक घरात किंवा ऑफिसमध्ये झाडू उघड्यावर ठेवतात; परंतु त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तूनुसार, झाडू उघड्यावर ठेवल्याने घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात. म्हणून झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरील व्यक्तींची नजर जाणार नाही.

झाडू या दिशेला ठेवावा

वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्यासाठी दक्षिण, पश्चिम दिशा सर्वांत शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, त्या दिशेला झाडू ठेवल्याने घरात सुख, शांती, संपत्ती व समृद्धी येते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाददेखील मिळतो.

झाडू कधी खरेदी करावा?

नवीन झाडू खरेदी करण्यासाठी काही दिवस शुभ मानले जातात. वास्तूनुसार, अमावास्येच्या दिवशी आणि मंगळवार, शनिवार व रविवारी झाडू खरेदी करणे चांगले. तथापि, सोमवार आणि शुक्ल पक्षामध्ये झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

झाडू ठेवण्यासाठी महत्त्वाचे नियम

  • वास्तुशास्त्रानुसार, झाडू कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये. ही दिशा देवतांची दिशा मानली जाते. तेथे झाडू ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय झाडू स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्येही ठेवू नये.
  • वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेला झाडू वापरू नका.
  • झाडू नेहमी खाली ठेवा, तो उभा ठेवू नये.
  • वास्तुशास्त्रानुसार घरात जिथे तुम्ही तुमचे पैसे किंवा दागिने ठेवता, तिथे कधीही झाडू ठेवू नका.
  • त्याशिवाय झाडू बाथरूम किंवा शौचालयाजवळ ठेवणेदेखील टाळावे.